26 September 2020

News Flash

खाऊखुशाल : अस्सल मराठी पदार्थाची खाद्यपंढरी

गेली सत्तर वर्षे सर्वोत्तम सेवा देऊन प्रकाशने ग्राहकांशी आपुलकीचं नातं जपलं आहे.

पंढरीची वारी केलेला माणूसच वारीला जाण्याचं समाधान काय असतं ते सांगू शकतो. तसंच खादाडी करणाऱ्यांचंही आहे. एखादा विशिष्ट पदार्थ खाण्यासाठी अमुक ठिकाणीच का भेट द्यायची हे त्याला बरोबर ठाऊक असतं. कारण तो पदार्थ खाण्याचं समाधान तिथे मिळतं ते आणखी कुठेही मिळत नाही. तुम्हाला अस्सल मराठमोळे, घरगुती व पौष्टिक पदार्थ खायचे असतील आणि तुम्ही जर दादर भागात असाल तर आपसूकच तोंडावर नाव येतं प्रकाश शाकाहारी उपाहार केंद्र. गिरगावात १९४७ मध्ये प्रकाश दुग्धमंदिराद्वारे दुधाच्या धंद्याने शिवराम गोविंद जोगळेकर यांनी व्यवसायाला सुरुवात केली. त्यानंतर १९७१ साली दादर येथे प्रकाश शाकाहारी उपहार केंद्र सुरू करण्यात आले. गेली सत्तर वर्षे सर्वोत्तम सेवा देऊन प्रकाशने ग्राहकांशी आपुलकीचं नातं जपलं आहे.

प्रकाशचा साबुदाणा वडा जगप्रसिद्ध म्हणावा लागेल. कारण थेट न्यूयॉर्क टाइम्सने त्याची दखल घेतलेली आहे. आजोबांनी तयार करून ठेवलेले पदार्थाचे फॉम्र्युले आजही तसेच्या तसे वापरले जात असल्याचं आशुतोष जोगळेकर मोठय़ा अभिमानाने सांगतात. या वडय़ांचं वेगळेपण काय तर त्यामध्ये शेंगदाण्याचा भरपूर वापर केलेला असतो. ऑर्डरनुसारच वडा तळला जातो आणि शेंगदाणा व नारळाच्या चटणीसोबत सव्‍‌र्ह केला जातो. मिरची, जिरं, शेंगदाणा, साखर, बटाटा यांचं मिश्रणातून तयार झालेली लज्जतदार साबुदाणा खिचडीदेखील प्रकाशची खास ओळख. त्याचसोबत बटाटय़ाचा भरपूर वापर असलेली पसरट बटाटापुरीही लोकांच्या खास आवडीची आहे.

इथली मिसळही इतर ठिकाणी मिळणाऱ्या मिसळीपेक्षा वेगळी म्हणजेच र्ती वाली नसून सुकी आहे. बटाटय़ाची सुकी भाजी, पोहे, मटकीची आणि लाल चण्याची उसळ, चिवडा, बारीक तिखट शेव आणि सोबतीला लिंबू अशी ही मिसळ खाल्ल्यावरच त्याच्या चवीचं वेगळेपण लक्षात येतं. थालीपीठ तयार करण्याच्या भाजणीची प्रकाशची विशिष्ट रेसिपी असल्याने थालीपीठ चवीला खास लागते. त्याची खरी लज्जत वाढते ती सोबत दिल्या जाणाऱ्या दहय़ामुळे. कारण त्यामध्ये मिरचीचं लोणचं असतं.

महाशिवरात्र, आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या तीन दिवशी प्रकाशचा संपूर्ण मेन्यू उपवासाचा असतो. उपवासाची मिसळ, पुरी भाजी, उपवासाचं थालीपीठ, राजगिऱ्याच्या पिठाचं वेष्टन असलेला बटाटा वडा, बटाटा पुरी, वरीची भगर अशी नानाविध पदार्थाची जंत्रीच असते. हळदीच्या फोडणीचा सांजा म्हणजेच तिखट शिरा हा क्वचितच मिळणारा पदार्थ दर बुधवार, रविवार आणि सोमवारी मिळतो.

तांदळाची भाकरी, पिठलं आणि मिरचीचा ठेचाही आवर्जून खावी अशीच. वारानुसारही वेगवेगळे पदार्थ येथे मिळतात. मसाले भात, पुलाव करी, कचोरी, भगर भरली वांगी, ओला वाटाणा पॅटीस, ओला वाटाणा पॅटीस, अळूवडी, कोथिंबीर वडी, वांगी पोहे, मठ्ठा मिसळ, भाजणी वडे, दही वडा असे मराठमोळे पदार्थ एकाच छताखाली मिळणे म्हणजे खवय्यांची चंगळच.

कुठलाही रंग न टाकलेलं आणि केशरचा वापर केलेलं केशरी श्रीखंड प्रकाशची खासियत आहे. साधं श्रीखंड, नारळी पाक, मावा पेढा, दुधी वडी, दुधी हलवा, खरवस, पुरणपोळी, माव्याचे पेढे हे गोड पदार्थ आणि दर मंगळवारी, संकष्टीला व गणपतीच्या काळात उकडीचे मोदकही मिळतात. पिण्याच्या पदार्थामध्ये पीयूष, कोकम सरबत, आवळा सरबत, सोलकढी, चहा, कॉफी, मसाला दूध हे पर्याय आहेत. कुठल्याही कोल्डड्रिंकची विक्री येथे केली जात नाही. मराठी पदार्थामध्येच भरपूर व्हरायटी असल्याने आजवर पावभाजी किंवा डोसासारखे पदार्थ ठेवायची गरज भासलेली नाही, असं जोगळेकर सांगतात. तसंच कुठल्याही पदार्थासोबत पाव दिला जात नाही, हेदेखील विशेष. त्यामुळे आरोग्याला आणि खिशाला परवडणारे मराठमोळे पदार्थ चाखायचे असतील तर प्रकाशला एकदा तरी जरूर भेट द्ययला हवी.

प्रकाश शाकाहारी उपाहार केंद्र

  • कुठे – हिना हिराई झोन, गोखले रोड, दादर (पश्चिम), मुंबई – ४०००२८
  • कधी – सोमवार ते रविवार सकाळी ७.३० ते रात्री ९.४५ वाजेपर्यंत.

@nprashant

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2017 2:47 am

Web Title: prakash uphar gruh dadar maharashtrian food
Next Stories
1 पेट टॉक : पेट फ्रेंडली हॉटेल्स
2 ७० हजार जागांसाठी अकरावीची खास प्रवेश फेरी
3 पागडी तत्वावरील भाडेकरूंना मालकी हक्क
Just Now!
X