News Flash

मराठी भाषेचं तेज आचार्य अत्र्यांनी शिकवलं!

२८ मार्च १९८१ रोजी पुण्यातील आचार्य अत्रे सभागृहाचे उद्घाटन झाले.

२८ मार्च १९८१ रोजी पुण्यातील आचार्य अत्रे सभागृहाचे उद्घाटन झाले. त्या वेळी श्रोत्यांच्या आग्रहास्तव पु. ल. देशपांडे यांनी आयत्या वेळी भाषण केले. आचार्य अत्रे यांच्यावरील पुलंचे ते भाषण म्हणजे श्रोत्यांना मेजवानीच होती. त्या भाषणातील काही भाग.

..आत्तापर्यंत आचार्य अत्रे यांच्यावर प्रत्येकाने बोलण्याचा प्रयत्न केला (हशा). मी असे विधान करतो याचे कारण असे की, आचार्य अत्रे ही अशी व्यक्ती होती तिच्यावर किती बोलले तरी शिल्लक राहते. काही धाडसी लोकांनी त्यांच्यावर ‘पीएच.डी.’ करण्याचाही प्रयत्न चालविला आहे (हशा). काही व्यक्ती महाराष्ट्रात अफाट झाल्या आहेत. बाळ गंगाधर टिळक, आचार्य अत्रे ही माणसेच अशी आहेत की त्यांच्याबद्दल कोणत्या अंगाने लिहावे आणि बोलावे?

आज आम्ही मोकळेपणाने लोकांना सांगू शकतो, न घाबरता सांगू शकतो की आम्ही अत्र्यांच्या काळात वाढलो. आम्ही मनात खांडेकर आणि जनात अत्रे धरूनच सगळं बोलत होतो (हशा). याचे कारणही तसंच आहे. अफाट लोकप्रियता बालगंधर्वाना आणि अत्र्यांना मिळाली. कारण हा आपला माणूस आहे असं लोकांना वाटत असे. तो बरोबर बोलतो असं वाटे. आपल्या विचारालाच प्रतिसाद मिळत आहे असं त्यांना वाटे. त्यांचा महाराष्ट्रावरचा सर्वात मोठा उपकार असा की अस्सल मराठी भाषेचं तेज म्हणजे काय ते त्यांनी आम्हाला शिकविलं. मराठीकडे थट्टेचा विषय म्हणून दुर्लक्ष होई. त्याच मराठीच्या माध्यमातून आचार्य अत्र्यांनी हसविलं आणि हसवता हसवता महाराष्ट्राला शहाणं केलं (टाळ्या). संयुक्त महाराष्ट्राचे दिवस आठवतात. अन्यायाविरुद्ध संतापून उठणं म्हणजे काय हे त्यांनी दाखवून दिलं. वन्ही चेतवित ठेवण्याचं, त्वेषानं लोकांना उठविण्याचं सामथ्र्य त्यांच्याकडं होतं. याचं कारण त्यांच्या जीवनाचे सर्वस्वच मुळी उत्कटतेत होतं. त्यांना लहान काही दिसत नाही. मी एकदा अत्रे यांना म्हटलं, आम्ही सारे जण बे एके बे, बे दुणे चार शिकलो. तुमच्या मास्तरांनी तुम्हाला दोन हजार एके दोन हजार, दोन हजार दुणे चार हजार असंच शिकवलेलं दिसतय (प्रचंड हशा).आमच्या म्युनिसिपल शाळेतील मास्तरांना आम्हाला दोन सांगतानाही आपण जास्त सांगतो असं वाटायचं. अत्र्यांना कोण ते  सासवडचे गुरुजी मिळाले कोण जाणे (हशा).

एकदा माझं आणि अत्र्यांचं एका व्यासपीठावर भाषण होतं. अत्र्यांनी मला विचारलं, पीएल किती माणसं सभेला आहेत असं तुला वाटतं? मी आपला कारकुनी अंदाज करीत सांगितलं, असतील हजार बाराशे. अरे काय म्हणतोस, अत्रे म्हणाले. ७० ते ८० हजार लोक म्हण. नाही तर जिल्हा पत्राचाही तू संपादक होणार नाहीस (प्रचंड हशा). पुण्यात सभा असल्यामुळं एक माणूस दहा माणसांबरोबर होता ही गोष्ट निराळी (टाळ्या आणि हशा).

अत्रे ज्या क्षणी लिहित होते त्या क्षणाशी ते अत्यंत प्रामाणिक होते. मग ते त्या वेळी कोणतंही कृत्य करीत असो. कारण विनोदी लेखकाचे वैशिष्टय़च हे असते की त्याला जीवनातील सुसंगत म्हणजे काय ते कळावं लागतं. त्या वेळीच तो विसंगतीवर लिहू शकतो. अत्र्यांचं वाचन अफाट होतं. त्यांच्या शैलीवर संत वाङ्मयाचे संस्कार आहेत. अत्र्यांसारखं सरळ मराठी आज कुणी लिहीत नाही. आचार्य अत्रे व्यक्ती नसून जीवनाकडे पाहण्याची दृष्टी होती. चागलं असेल त्याला अति चांगलं करीत, वाईट असेल त्याला अतिवाईट ठरवून झोडपूनही काढीत. अशी त्यांची विचारसरणी होती. प्रत्येक क्षेत्रांत त्यांनी कर्तृत्व गाजवलं. अशा व्यक्तीला लवकर विसरून जाण्याइतका महाराष्ट्र कृतघ्न नाही.

untitled-6

संकलन- शेखर जोशी

(माधव गडकरी लिखित आणि रोहन प्रकाशन प्रकाशित सभेत कसे बोलावेया पुस्तकावरुन साभार)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2017 12:49 am

Web Title: pralhad keshav atre oratory
Next Stories
1 जिल्हा बँक, बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना थेट मताधिकार
2 स्वच्छता अभियानात कसूर; आयुक्त अडचणीत
3 BMC election 2017: शिवसेनेत बंडाळी; भाजपमध्ये घराणेशाहीमुळे धुसफूस
Just Now!
X