माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उद्या होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमासाठी नागपुरात दाखल झाले आहेत. बुधवारी संध्याकाळी नागपुर विमानतळावर आरएसएसच्या स्वयंसेवकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रणव मुखर्जी कार्यक्रमाचे मुख्य अतिथी असून संघाच्या तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपासाठी ते नागपुरात आले आहेत.

काँग्रेसच्या विचारधारेला मानणारे प्रणव मुखर्जी उद्या होणाऱ्या कार्यक्रमात काय बोलणार ? कोणती भूमिका मांडणार ? याबद्दल प्रचंड उत्सुक्ता आहे. कारण काँग्रेस आणि आरएसएस यांच्या विचारधारेत कमालीचे अंतर असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आपल्या प्रत्येक भाषणातून आरएसएसवर सडकून टीका करत असतात. त्यामुळे मुखर्जी उद्या काय बोलणार ? याकडे राजकीय तज्ञ, पत्रकारांचेच नव्हे तर सर्वसामान्यांचेही लक्ष लागले आहे.

काँग्रेस आणि सरकारमध्ये विविध पदे भूषवताना मुखर्जींनी नेहमीच संघ आणि भाजपावर टीका केली आहे. त्यामुळे आता संघाच्या मंचावरुन काय बोलणार याची उत्सुक्ता आहे. मुखर्जी आरएसएसच्या व्यासपीठावरुन पहिल्यांदाच संबोधित करणार आहेत. हिंदुत्वाच्या विचारधारेचे समर्थन करणाऱ्या आरएसएसचे मुखर्जींनी निमंत्रण स्वीकारणे काही काँग्रेस आणि डाव्या नेत्यांना पटलेले नाही. त्यांनी आपली नाराजीही बोलून दाखवली आहे.

मुखर्जी आरएसएसच्या व्यासपीठावर जाणार असले तरी मुखर्जी त्यांच्या राजकीय जीवनात नेहमीच स्पष्टवक्ते राहिले आहेत. दरम्यान मुखर्जींनी मला माझी जी काही भूमिका मांडायची आहे ती भूमिका मी नागपुरात मांडेन असे आनंद बाजार पत्रिका या बंगाली वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निमंत्रण दिल्यानंतर मला अनेक पत्रे आली, काही जणांनी मला फोनही केले. मात्र कोणालाही उत्तर दिलेले नाही. मी माझी भूमिका नागपुरातच स्पष्ट करणार आहे असे मुखर्जी यांनी म्हटले आहे. काँग्रेसमधले काही वरिष्ठ नेते जयराम रमेश, सी. के. जाफर शरीफ, रमेश चेन्निथला यांनी प्रणव मुखर्जी यांना संघाच्या कार्यक्रमाला न जाण्याचा सल्ला दिला होता.