तब्बल दोन दशके मुंबई पोलिसांना हुलकावणी देणारा संघटित टोळीचा म्होरक्या कुमार पिल्ले हाती लागल्यानंतर आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने त्याचा विश्वासू साथीदार प्रसाद पुजारी याचा माग घेण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण मध्य आशियाई देशात लपून गुन्हेगारी जगताची सूत्रे हलविणाऱ्या प्रसाद पुजारीची नाकेबंदी आता सुरू करण्यात आली असून तोही लवकरच सापळ्यात अडकेल, असा विश्वास गुन्हे विभागातील वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केला आहे. गुन्हे अन्वेषण विभागाचे तत्कालीन सहआयुक्त हिमांशू रॉय तसेच माजी अतिरिक्त आयुक्त देवेन भारती यांच्या काळात कुमार पिल्ले याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटिशीची कारवाई पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया सुरू करण्यास मुंबई पोलिसांना यश आले होते. या प्रयत्नांमुळेच पिल्लेला जेव्हा सिंगापूरमध्ये अटक झाली तेव्हा त्याचा ताबा थेट मुंबई पोलिसांना मिळाला. मुंबई पोलिसांच्या पथकाने प्रत्यक्षात परदेशात जाऊन पिल्लेचा ताबा घेतला. आता प्रसाद पुजारीसाठी पोलिसांनी नाकेबंदी केली आहे. रवी पुजारीही रडारवर असल्याचे या सूत्रांनी सांगितले. संघटित गुन्हेगारीचा कणा मोडून टाकण्यात आम्ही यशस्वी झाल्याचे मत वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केले आहे.