प्रसाद रावकर

स्वातंत्र्य चळवळीत जनतेची एकजूट करण्यासोबत समाजप्रबोधन करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप गेल्या काही दशकांत पार बदलले आहे. वाद्यांचा दणदणाट, मद्यप्राशन करून होणारे नृत्य, वारेमाप उधळपट्टी, मंडळां-मंडळांमध्ये होणारे वाद, हाणामाऱ्या या गोष्टींनी गणेशोत्सवाच्या मूळ संकल्पनेलाच फाटा दिला आहे.

गेल्या काही दशकांमध्ये मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव साजऱ्या करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या झपाटय़ाने वाढत गेली. पूर्वी चाळी, वस्त्यांमध्ये गणेशोत्सव साजरा होता होता. मात्र कालौघात टॅक्सी-रिक्षा स्टॅण्ड, वाहनतळ, बाजापेठा, मंडया, रस्ते, पदपथ, चौक आदी ठिकाणी गुंडा-पुंडांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे स्थापन केली आणि सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होऊ लागला. गणेशोत्सवासाठी रस्ते, पदपथ, सार्वजनिक ठिकाणी मंडप उभे राहू लागले. उभारलेल्या मंडपाचा कुणाला त्रास होणार नाही ना याचीही कुणी पर्वा करीत नव्हते. मुळात अरुंद असलेले रस्ते मंडपामुळे अडले आणि त्याचा वाहतूक आणि पादचाऱ्यांना फटका बसू लागला. गणपतीसाठी दहा दिवस त्रास सहन करू शकत नाही का, असा उद्दाम सवाल मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडून तक्रारकर्त्यांना केला जाऊ लागला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आणि अखेर या प्रकरणात न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला.

पादचारी आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा मंडपांना परवानगी देऊ नये असे सक्त आदेश न्यायालयाने यापूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले होते. पण लोकभावना लक्षात घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांनी मंडळांना अघोषित सूट दिली. मंडळांनी मात्र त्याचा पुरेपूर फायदा घेत पूर्वीप्रमाणेच मंडप उभे केले. पुन्हा वाहतूक आणि पादचाऱ्यांना त्याचा फटका बसला. या प्रकारांची न्यायालयाने गंभीर दखल घेत स्थानिक स्वराज्य संस्थांना फटकारले. वाहतूक आणि पादचाऱ्यांना अडथळा निर्माण करणारे मंडप दृष्टीस पडले, तर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांनी मंडप परवानगीसाठी अत्यंत कडक धोरण अवलंबिले होते. त्यावरुन प्रचंड गहजब झाला. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सुरुवातीला मंडप परवानगीवरून बरीच ओरड केली. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी मंडप परवानगीसाठी सुरू केलेल्या ऑनलाइन पद्धतीमधील त्रुटीवर बोट ठेवायला सुरुवात केली. अधिकारी जागेवर नसल्याची टीका केली. मात्र पालिकेने मुंबईत एकही मंडप परवानगीशिवाय उभा राहू नये यासाठी कंबर कसली. अखेर मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनीही मंडपाच्या आराखडय़ासह आवश्यक ती कागदपत्रे सादर केली आणि स्थानिक पोलीस, वाहतूक पोलिसाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळताच पालिकेने मंडळांना मंडप परवाना बहाल केला.

पूर्वी मंडप उभारणी सुरू होतानाच परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया केली जात होती. मात्र यंदा परवाना मिळाल्यानंतर मंडप उभारण्यात आले हे विशेष. काही मंडळांनी परवानगी मिळताच पूर्वीप्रमाणेच अवाढव्य मंडप उभारून रस्ते, पदपथ अडविले. पालिका आणि तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या पथकांच्या निदर्शनास आलेल्या अशा मंडपांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला खरा. पण आजही अनेक ठिकाणी परवानगी घेतल्यानंतर अवाढव्य मंडप उभारण्यात आले आहेत. काही ठिकाणी तर मंडपांच्या शेजारी सोडलेल्या चिंचोळ्या मार्गिकेवरून रुग्णवाहिकाही जाऊ शकत नाही. जेमतेम पादचाऱ्याला चालण्याइतकी मार्गिका सोडण्यात आली आहे. पण त्याकडे यंत्रणांचे दुर्लक्ष झाले आहे. सण-उत्सवांबाबतची लोकभावना, राजकीय कृपादृष्टी असे अनेक कंगोरे यंत्रणांच्या कारवाईत अडथळे बनतात. मात्र न्यायालयाचे आदेश आणि लोकभावना यांच्या कात्रीत यंत्रणा अडकली आहे. कारवाई केली तर लोकभावनेपोटी मोठा गोंधळ होऊ शकतो, कारवाई केली नाही तर न्यायालयाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल अशी यंत्रणांची ‘इकडे आड तिकडे विहीर’ अवस्था झाली आहे. कुठूनही यंत्रणांचाच यात बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकमान्यांनी समाजाला एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. पण आता गणेशोत्सवानिमित्त पदपथ, रस्त्यांवर उभारण्यात येणारे मंडप, कर्णकर्कश आवाजात वाजविली जाणारी वाद्ये, लेझीम ढोलच्या तालात निघणाऱ्या मिरवणुका यामुळे अडचणी येऊ लागल्या आहेत. गणेशोत्सवापूर्वी काढल्या जाणाऱ्या गणेश आगमन मिरवणुकांमुळे वाहतूक वेठीला धरली जात आहे. आपण गणेशोत्सव नेमका कशासाठी साजरा करतो याचा समस्त मंडळांना विसर पडू लागला आहे. गणेश दर्शनाच्या निमित्ताने गर्दी वाढावी, दानपेटीच्या माध्यमातून मंडळाला धनलाभ व्हावा, आपल्या मंडळाचे नाव सर्वमुखी व्हावे इतकाच उद्देश कार्यकर्ते मनी बाळगून आहेत. मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखून आणि भान राखून वागायला हवे. अन्यथा भविष्यात गणेशोत्सवावर अनेक र्निबध येतील आणि त्याला केवळ आणि केवळ मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेच जबाबदार असतील यात शंका नाही.

prasadraokar@gmail.com