19 October 2020

News Flash

प्रशांत दामले-मंगेश कदम यांच्यात गप्पाष्टक

‘लोकसत्ता सहज बोलता बोलता’मध्ये शुक्रवारी संवादमैफल  

(संग्रहित छायाचित्र)

नाटक असो वा चित्रपट, मालिका असो वा एखाद्या कार्यक्रमांचे संचालन आपल्या अस्तित्वानेच वातावरण मोकळे करत विविध भूमिकांमध्ये रंग भरणारे अभिनेता प्रशांत दामले यांच्याशी गप्पा मारण्याचा योग ‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’ कार्यक्रमाच्या निमित्ताने जुळून आला आहे.

प्रशांत दामले यांच्या आजवरच्या नाटय़प्रवासाचे साक्षीदार आणि त्यांच्या अनेक नाटकांचे दिग्दर्शक-अभिनेता मंगेश कदम त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.

नाटकात मनापासून रमलेल्या प्रशांत दामलेंना प्रयोगांचा विक्रमादित्य असेही म्हटले जाते. कारण सर्वाधिक प्रयोग करण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. खाणे, गाणे आणि नाटक या तिन्हींचे अजब रसायन अंगी बाळगून असलेला प्रशांत दामलेंसारखा हरहुन्नरी अभिनेता-निर्माता आणि नाटय़क्षेत्रातील नावाजलेले दिग्दर्शक-अभिनेता मंगेश कदम या दोघांमध्ये रंगणारे हे गप्पाष्टक शुक्रवारी, २५ सप्टेंबरला ‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’च्या निमित्ताने अनुभवता येणार आहे.

मंगेश कदम हे ही उत्तम विनोदी अभिनेते आहेत. ‘असा मी असा मी’, ‘वस्त्रहरण’ सारख्या नाटकांमधून त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. रत्नाकर मतकरींचे ‘तन-मन’, ‘एका लग्नाची गोष्ट’, ‘गोष्ट तशी गमतीची’ सारख्या नाटकांचे दिग्दर्शक  म्हणून मंगेश कदम लोकप्रिय आहेत. कलाकार आणि दिग्दर्शक म्हणून प्रशांत-मंगेश या जोडीने एकत्र कामही केले असल्याने अनुभवातून रंगणारा हा गप्पांचा प्रयोग अनोखा ठरेल याद वादच नाही.

नव्वदच्या दशकात ‘टूरटूर’सारख्या नाटकांतून रंगभूमीवर प्रवेश केलेल्या प्रशांत दामले यांनी सुरूवातीच्या काळात तत्कालिन कलाकारांप्रमाणे नोकरी सांभाळून अभिनयाच्या क्षेत्रात धडपड केली होती. ‘बेस्ट’ची नोकरी सांभाळत सुरू झालेला हा अभिनयाचा प्रवास नाटक-चित्रपट अशा विविध माध्यमांतून खुलत गेला. ‘मोरुची मावशी’, ‘लग्नाची बेडी’, ‘ब्रह्मचारी’, ‘लेकुरे उदंड जाहली’, ‘गेला माधव कुणीकडे’, ‘प्रियतमा’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘जादू तेरी नजर’, ‘एका लग्नाची गोष्ट’, ‘संगीत संशयकल्लोळ’, ‘साखर खाल्लेला माणूस’.. त्यांच्या लोकप्रिय नाटकांची ही यादी अशी वाढतच जाते. अस्सल विनोद हरवत चालला असताना त्यांच्या अभिनयातली सहजता नजरेत भरते. म्हणूनच सातत्याने दर्जेदार विनोदी नाटके देणाऱ्या कलाकाराचे महत्त्व आज ठळकपणे जाणवते.

आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत अभिनेता म्हणून २७ नाटके , ३७ मराठी चित्रपट आणि २४ मालिकांमधून रसिकांचे हसत-खेळत निखळ मनोरंजन करणारे प्रशांत दामले हे एका पिढीचे नव्हे तर अबालवृद्धांची वाहवा मिळवलेले लोकप्रिय कलाकार आहेत. मराठी नाटके सातासमुद्रापार नेणाऱ्या, खवय्येगिरीचे कार्यक्रमही सहज रंगवणाऱ्या प्रशांत दामलेंसारख्या हरहुन्नरी अभिनेत्याशी होणारी ही गप्पांची मैफल अविस्मरणीय ठरेल.

सहभागासाठी : https://tiny.cc/LS_SahajBoltaBolta_25Sept  येथे नोंदणी आवश्यक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2020 12:21 am

Web Title: prashant damle mangesh kadam in loksatta sahaj bolta bolta abn 97
Next Stories
1 सुशांत सिंह मृत्यू प्रकरण : NCB श्रुती मोदी आणि जया शाह यांची करणार चौकशी
2 काँग्रेसचा हात शेतकऱ्यांविरोधात व दलालांबरोबर – केशव उपाध्ये
3 शेतकऱ्यांनी आता ‘आत्मनिर्भर’ व्हावं -अनुपम खेर
Just Now!
X