शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी आज शिवसेनेच्या खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीत एक विशेष उपस्थिती होती ती म्हणजे प्रसिद्ध राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांची. या बैठकीत किशोर यांनी शिवसेनेच्या खासदारांना मार्गदर्शनही केल्याचे सुत्रांकडून कळते. त्यामुळे शिवसेना-भाजपा युतीसाठी प्रयत्न करण्याबरोबरच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची प्रचार रणनीती ठरवण्याची जबाबदारी किशोर यांच्यावर सोपवण्यात आल्याची, चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

प्रशांत किशोर यांनी शिवसेनेच्या बैठकीत हजेरी लावल्याच्या वृत्ताला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही दुजोरा दिला आहे. प्रशांत किशोर हे जनता दल युनायटेड या पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. त्यांचा पक्ष एनडीएत सहभागी असल्याने उद्धव ठाकरेंची सदिच्छा भेट घेण्यासाठी ते मातोश्रीवर आले होते, असे राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

किशोर यांची केवळ सदिच्छा भेट असल्याने ते शिवसेनेची प्रचार रणनीती सांभाळणार असल्याची चर्चा केवळ माध्यमांमध्येच आहे, त्याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. पक्षात प्रचाराची धुरा सांभाळण्याची जबाबदारी नेहमी शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे असते. शिवसेना नेहमीच आपली रणनिती ठरवत असते. युतीसाठी आम्हाला कुठल्याही मध्यस्थाची गरज नाही, हा काही व्यापार नाही. उद्धव ठाकरे प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायला सक्षम आहेत. हळू हळू आपल्याला सर्वकाही कळेल असे सांगत मात्र, त्यांनी या चर्चेच्या शंकेला वावही दिला आहे.

शिवसेना कायमच मोठा भाऊ राहिला आणि यापुढे राहणार असल्याचा पुनरुच्चार राऊत यांनी पुन्हा एकदा केला आहे. राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रातील जनता ठरवेल तर देशाचा पंतप्रधान मात्र, शिवसेनाच ठरवेल असा विश्वास त्यांनी यावेली व्यक्त केला. त्याचबरोबर अण्णा हजारेंच्या उपोषणाबाबत बोलताना राऊत म्हणाले, अण्णांना भेटण्यापेक्षा त्यांच्यामागे आम्ही ताकद उभी करु, ते काम उद्धव ठाकरे करीत आहेत.