12 July 2020

News Flash

खाऊ खुशाल : रसरशीत जिलेबी

धुलारामजी रावल यांनी १८९७ साली व्यवसायाची सुरुवात केली तेव्हा सकाळच्या वेळेस जिलेबी आणि नंतर दिवसभर ते कुल्फी विकत असत.

(संग्रहित छायाचित्र)

प्रशांत ननावरे

पर्शियन व्यापाऱ्यांमुळे भारतात जिलेबी आली. सर्वप्रथम तिचे आगमन महाराष्ट्र व गुजरातमध्ये झाले आणि मग संपूर्ण देशभरात तिचा संचार झाला. छत्रपती शाहू महाराजांनी पंचम जॉर्जच्या स्वागतार्थही जिलेबी वाटल्याचा संदर्भ मिळतो. अशी ही जिलेबी सणावाराच्या निमित्ताने आयोजित पंक्तीतला मुख्य पदार्थ तर असतेच पण इतरवेळीही गोड पदार्थ म्हणून जिलेबीचाच आग्रह पहिल्यांदा धरला जातो. गुजरातसारख्या राज्यात तर सकाळच्या न्याहरीमध्येही जिलेबीचा समावेश असतो. काही अंशी मुंबईतील गुजरातीबहुल भागातही हीच परंपरा आहे. गोड पदार्थ मिळणाऱ्या बहुतेक सर्व दुकानांमध्ये जिलेबी मिळत असली तरी अनेक जण कायमच चांगल्या जिलेबीच्या शोधात असतात. त्यांचा शोध १२० वर्षांची परंपरा लाभलेल्या ‘मुंबादेवी जलेबीवाला’पाशी येऊन संपायला हरकत नाही.

धुलारामजी रावल यांनी १८९७ साली व्यवसायाची सुरुवात केली तेव्हा सकाळच्या वेळेस जिलेबी आणि नंतर दिवसभर ते कुल्फी विकत असत. दुकानाचं नावंही ‘कुल्फी हाऊस जलेबीवाला’ असं होतं. रावल यांनी तयार केलेली कुल्फी संस्थानिक, ब्रिटिश आणि पारशी मंडळीच्या पाटर्य़ाची शान वाढवत असे. पुढे १९४२ साली जेव्हा देशाला मोठय़ा दुष्काळाला सामोरं जावं लागलं तेव्हा दुधाचा ओघ आटला. लोकांना प्यायला दूध मिळत नव्हतं. त्यामुळे आपण त्याचा धंदा करणं योग्य नव्हे असा विचार रावल कुटुंबीयांच्या मानात आला. तेव्हापासून त्यांनी कुल्फी विकणं बंद केलं आणि पूर्णवेळ जिलेबी विकायला सुरुवात केली. त्या वेळेस दिवसभर जिलेबी विकण्याबद्दल त्यांना लोक हसायचे. पण नंतर नंतर त्याची लोकांनाच सवय लागली. एवढंच काय आजसुद्धा चोवीस तास फक्त गरमागरम जिलेबी विकणारा ‘मुंबादेवी जलेबीवाला’ हा मुंबईतील एकमेव ब्रॅण्ड आहे.

धुलारामजी यांच्यानंतर त्यांचा मुलगा बाबुलालजी मग तिसऱ्या पिढीतील महेंद्रकुमार आणि आता त्यांचा मुलगा विकास रावल हा व्यवसाय सांभाळत आहेत. मुंबादेवी मंदिर आणि रावल यांच्या दुकानाची भिंत एकमेकांना खेटून आहे. त्यामुळे लोकांनीच यांच्या दुकानाला ‘मुंबादेवी जलेबीवाला’ असं म्हणायला सुरुवात केली. मग १९८५ साली महेंद्रकुमार यांनी दुकानाचं नाव बदलून ‘मुंबादेवी जलेबीवाला’ असं नामकरण केलं.

दुकानाच्या स्थापनेपासून ते १९९० पर्यंत कोळशाच्या भट्टीवर जवळपास तीन फूट रुंदीच्या कढईमध्ये गाईच्या दुधापासून तयार केलेल्या तुपात जिलेबी तळली जायची. कोळशाची भट्टी विशिष्ट तापमानाला सतत धगधगत ठेवणं हे एक प्रकारचं आव्हान होतं. त्यामुळे त्या भट्टीवर तळलेल्या जिलेबीची चव काही औरच होती, अशी आठवण विकास रावल सांगतात.

इथल्या जिलेबीची खासियत म्हणजे त्याची जाडी, रसाळपणा आणि कुरकुरीतपणा. त्या चवीलाही कारणीभूत आहे ते म्हणजे त्याचं पीठ. गेल्या १२० वर्षांत त्याची रेसिपी बदललेली नाही. इथल्या जिलेबीचं पीठ हे पातळ नसून थोडं जाडसर असतं. त्यामुळे कपडय़ातून कढईमध्ये जिलेबी पाडताना थोडा अधिकचा जोर लावावा लागतो. तुम्ही इथे दिवसभरात कधीही या, तुमच्या डोळ्यांदेखतच जिलेबी तयार करून दिली जाते. ऑर्डर आली की आधी जिलेबीचं पीठ फडक्यात घेतलं जातं. नंतर मोठय़ा कौशल्यानं जिलेबी तयार करण्याचं काम सुरू होतं. गरमागरम तुपात एका रांगेत जिलेबीचे वेटोळे पाडले जातात. त्याला चिमटीने दोन्ही बाजूंनी परतवून घेतलं जातं. वेटोळे मस्तपैकी फुलल्यावर त्यांना बाजूला ठेवलेल्या साखरेच्या पाकात त्यांची रवानगी केली जाते. डोळ्यादेखत जिलेबी तयार होताना पाहणं हीदेखील वेगळीच मजा आहे. कारण त्या गरमागरम, चमचमणाऱ्या, थोडी कुरकुरीत आणि रसरशीत जिलेबीचा तुम्ही जेव्हा चावा घेता तेव्हा ती संपूर्ण प्रक्रिया तुमच्या डोळ्यांसमोर सरकते आणि त्याची गोडी आणखीनच वाढते.

या दुकानात इतर कुठलेच पदार्थ मिळत नाहीत. जिलेबीसोबत केवळ पापडी मिळते आणि उभी चिरलेली मसालेदार पपई व मिरची दिली जाते. केवळ दोनच गोष्टी मिळत असल्याने त्याची प्रत कायम जपली जाते. एकच पारंपरिक गोड पदार्थ विकणारं कुठलंही दुकान मुंबईत अस्तित्वात नाही. शतकी परंपरा लाभलेल्या ‘मुंबादेवी जलेबीवाला’कडे तो मान जातो. त्यामुळे अशा दुकानातल्या जिलेबीची चव आवर्जून चाखायला हवी.

मुंबादेवी जलेबीवाला

कुठे – ४९, राज आर्केड, डी-मार्ट समोर, महावीर नगर, कांदिवली (पश्चिम), मुंबई – ४०००६७

कधी – सोमवार ते रविवार सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत.

nanawareprashant@gmail.com

@nprashant

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2018 2:29 am

Web Title: prashant nanavare khau khushal article 2
Next Stories
1 चांदीच्या सूक्ष्म कणांचा सापाच्या विषावर उतारा
2 ३० आठवडय़ांच्या गर्भपातास परवानगी
3 साडेचारशे कुटुंबांच्या गृहस्वप्नांचा चुराडा?
Just Now!
X