देशातील एक लाखांहून अधिक वस्त्यांमधील मुलांच्या गुणवत्तावाढीचे प्रयत्न
देशभरातील हजारो शाळांमधील विद्यार्थ्यांना नीट वाचता येत नाही, लिहिता येत नाही आणि साधी गणितेही सोडविता येत नाहीत. हे चित्र बदलण्यासाठी ‘प्रथम’ या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेऊन देशभरातील एक लाखाहून अधिक वस्त्या व खेडय़ांमध्ये ‘लाखात एक’ हा अभिनव उपक्रम राबविला जाणार आहे. सर्वसामान्य मुलांचे पालक, स्वयंसेवी संस्था, खासगी कंपन्या आणि शिक्षक अशा सर्वाना एकत्र घेऊन १७ नोव्हेंबरपासून ही योजना कार्यान्वित करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता त्यातून उंचावली जाणार आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा घसरला आहे असे प्रथम, असर यासारख्या स्वयंसेवी संस्था आणि सरकारच्या सर्वेक्षणांमधूनही वेळोवेळी दिसून येत असते. पण केवळ शाळा व शिक्षकांना दोष देऊन उपयोग नाही. त्यासाठी सर्वानी प्रयत्न करणे आवश्यक असून त्यादृष्टीने वस्ती पातळीवर आणि खेडय़ांमध्ये काम केले जाणार आहे. मुंबईत तीन हजार तर महाराष्ट्रात सुमारे १५ हजाराहून अधिक वस्त्या व खेडय़ांमध्ये हे काम केले जाईल. ‘प्रथम’च्या विश्वस्त फरिदा लांबे आणि ज्येष्ठ पदाधिकारी उषा राणे यांच्या पुढाकाराने देशभरातील वस्त्या व खेडय़ांमधील स्वयंसेवी संस्था आणि मुलांच्या पालकांची मदत घेण्यात येत आहे. मोलमजुरी, शेती व अन्य कामे करणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना आपली मुले शाळेत नियमित जातात की नाही, त्यांना योग्य शिक्षण दिले जाते का, अशी माहितीही नसते. त्यामुळे त्यांच्यातही जागरूकता निर्माण करून जानेवारी ते मार्च या काळात शाळा व शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्तावाढ करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे फरिदा लांबे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. या उपक्रमासाठी कार्यकर्त्यांच्या फळ्या तयार करण्यात आल्या असून, प्रत्येक वस्तीमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे व अनेक संस्थांची मदत मिळाली आहे. प्रत्येक वस्तीमध्ये किमान ५० मुले ही सहा ते १८ वयोगटातील असतील, असे अपेक्षित आहे. शाळाबाह्य़ मुलांचेही सर्वेक्षण करून त्यांना शाळेत पाठविण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

उपक्रमासाठी कार्यकर्त्यांच्या फळ्या तयार करण्यात आल्या असून, प्रत्येक वस्तीमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे व अनेक संस्थांची मदत मिळाली आहे. प्रत्येक वस्तीमध्ये किमान ५० मुले ही सहा ते १८ वयोगटातील असतील, असे अपेक्षित आहे. शाळाबाह्य़ मुलांचेही सर्वेक्षण करून त्यांना शाळेत पाठविण्याची व्यवस्था केली जाईल. सर्वेक्षणानंतर जानेवारी ते मार्च या कालावधीत विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातील,
-फरिदा लांबे, ‘प्रथम’च्या विश्वस्त

* लाखात एक’चे महत्त्वाचे टप्पे
* १७ नोव्हेंबर ते डिसेंबपर्यंत सर्वेक्षण व मूल्यमापन होणार
* शाळाबाह्य़ मुलांना शाळेपर्यंत पोचविणार
* गुणवत्ता सुधारणांसाठी शाळा व शिक्षकांकडे पाठपुरावा
* वस्ती व खेडय़ांच्या पातळीवरही विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन
* जानेवारी ते मार्च गुणवत्तावाढीचे प्रयत्न केले जाणार