राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांच्या निवृत्तीच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री पोलीस दलात मोठय़ा प्रमाणात फेरबदल केले. राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून प्रवीण दीक्षित यांची तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी विजय कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली.
दयाळ हे बुधवारी पोलीस महासंचालकपदावरुन तर अरुप पटनायक हे पोलीस गृहनिर्माण मंडळाच्या महासंचालकपदावरुन सेवानिवृत्त होत आहेत. प्रवीण दीक्षित यांची अपेक्षेप्रमाणे पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली असतानाच विजय कांबळे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती करुन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला असल्याचे बोलले जात आहे.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या बदल्यांमध्ये कांबळे यांची सेवाज्येष्ठता असतानाही त्यांना मुंबई पोलीस आयुक्तपदावरून डावलण्यात आल्यामुळे त्यांनी राजीनाम्याचा पवित्रा घेतला होता. अरुप पटनायक यांच्या जागी सतीश माथुर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर महासंचालक (तांत्रिक व विधि) या पदावर मीरा बोरवणकर यांना पदोन्नती देऊन नियुक्ती करण्यात आली आहे.