प्रविण दीक्षित यांनी पदभार स्वीकारला
राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून प्रवीण दीक्षित यांनी बुधवारी पदभार स्वीकारला. ते राज्याचे ३९वे पोलीस महासंचालक ठरले. महासंचालक संजीव दयाळ निवृत्त झाल्याने त्यांच्या जागी दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी झालेल्या छोटेखानी समारंभात दयाळ यांच्याकडून दीक्षित यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. पोलीस दलाला लोकाभिमुख बनविणे, तसेच गुन्हेगारांच्या दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्यावर भर देणार असल्याचे दीक्षित यांनी सांगितले.
मंगळवारी रात्री मुख्यमंत्र्यांनी प्रवीण दीक्षित यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. बुधवारी दुपारी १च्या सुमारास दीक्षित यांनी महासंचालक कार्यालयात आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. मावळते पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी त्यांना पदभार सोपविला. पदभार स्वीकारताच दीक्षित यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. गुन्हेगार न्यायालयात पुराव्याअभावी सुटतात. त्यामुळे शास्त्रीय आणि तांत्रिक उपायांचा वापर करून त्यांच्या दोषसिद्धीचे प्रमाण वाढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस दलाला लोकाभिमुख बनवून महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक, अनुसूचित जाती व जमातीतील नागरिक तसेच अल्पसंख्याकांच्या हक्काचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचे लक्ष्य असल्याचेही ते म्हणाले. प्रवीण दीक्षित हे १९७७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाचे प्रमुख असताना त्यांनी भ्रष्टाचाऱ्यांविरोधात विक्रमी कारवाई केली होती.
राष्ट्रवादीचे मातब्बर नेते छगन भुजबळ यांच्या महाराष्ट्र सदन घोटाळा, सुनील तटकरे, अजित पवार यांच्या सिंचन घोटाळ्याच्या प्रकरणाचा तपास दीक्षित यांनी केला होता. नोव्हेंबर २०१७ मध्ये ते निवृत्त होणार आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभाग प्रमुखपदी विजय कांबळे
आघाडी सरकारच्या काळात मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी डावलले गेलेले विजय कांबळे यांची लाचलुचतपत प्रतिबंधात्मक विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस गृहनिर्माण मंडळाचे महासंचालक अरुण पटनायक निवृत्त झाल्याने त्यांच्या जागी सतीश माथुर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कारागृहाच्या महासंचालिका मीरा बोरवणकर यांची विधी आणि तांत्रिक विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.