करोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी, तसेच राज्यातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून आरोग्य शिक्षण देण्यासाठी स्वयंसेवी संस्था तसेच लोकप्रतिनिधींच्या साहाय्याने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र यावरुनच आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला असून मुख्यमंत्री सोयीस्करपणे जबाबदारी जनतेवर टाकतात असा टोला लगावला आहे. एकाच वेळी मुख्यमंंत्री दोन प्रकारची वक्तव्य करत असून सध्या सरकार भांबावलेल्या अवस्थेत काम करत असल्याचेही दरेकर यांनी म्हटलं आहे. राज्यभरामध्ये आज भाजपाने मंदिरं खुली करण्यासाठी केलेल्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या दरेकर यांनी पत्रकारांशी बोलताना ठाकरे सरकार जबाबदारी झटक असल्याचा आरोप केला.

नक्की वाचा >> “दारु घरपोच मिळतेय पण शेतकऱ्याचा भाजीपाला नाही, महाराष्ट्राला आपण कुठे घेऊन चाललोय?”

जर राज्याची जबाबदारी तुमची आहे तर माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणून जनतेवर का जबाबदारी टाकता असा सवालही दरेकरांनी उपस्थित केला आहे. “मुख्यमंत्री एका वेळेला दोन प्रकारची वक्तव्य करतात. जर जबाबदारी तुमची आहे तर माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणून जनतेवर का जबाबदारी टाकता. तुमची सक्षम नाही, तुमच्या क्षमता नाही म्हणून तुम्ही माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणता. माझे सरकार माझी जबाबदारी का नाही. ज्या वेळेला विरोधक टीका करता त्यावेळी सांगतात माझी जबाबदारी. म्हणजे सोयीनुसार माझी जबाबदारी तर सोयीनं जनतेवर जबाबदारी टाकायची. त्यामुळे बोलतात काय कृती काय अशाप्रकारे भांबावलेल्या अवस्थेत सरकार या ठिकाणी काम करत आहे,” असं दरेकर म्हणाले.

नक्की वाचा >> ‘मदिरा चालू मंदिर बंद, उद्धवा तुझा कारभारच धुंद’; भाजपाचे सिद्धीविनायक मंदिरासमोर आंदोलन

मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरासमोर दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मंदिर पुन्हा सुरु करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं. यावेळी भाजपाचे नेते प्रसाद लाड हे ही उपस्थित होते. लाड यांनीही यावेळी, “माझे कुटुंब, माझी जबाबदारी बोलून काम संपत नाही तर त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर आलं पाहिजे,” असा टोला लगावला. “फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून केवळ टीव टीव करुन चालणार नाही. लोकांमध्ये जाऊन लोकांच्या भावना समजून घ्याव्या लागतील, हेच सांगण्यासाठी आम्ही आज हे आंदोलन करत आहोत,” असंही लाड म्हणाले.