मध्य, पश्चिम रेल्वे विस्कळीत

मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरात सोमवारी संध्याकाळनंतर विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पूर्वमोसमी पावसाने बेसावध नागरिकांची त्रेधा उडवली. मध्य आणि पश्चिम रेल्वे विस्कळीत झाल्याने कामावरून घरी परतणाऱ्यांचे हाल झाले. ठाणे, नवी मुंबई, बदलापूरसह अनेक भागांतील वीजपुरवठाही खंडीत झाला.

मुंबईतील दादर, माटुंगा, शीव, घाटकोपर, विक्रोळीसह मालाड, बोरिवली, कांदिवली परिसरात जोरदार सरी कोसळल्या. ठाणे आणि नवी मुंबइलाही पावसाने झोडपले. पावसाच्या तडाख्याने रेल्वेसेवा कोलमडली. ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वे मंदगतीने धावत होती. बोरिवली आणि वांद्रे स्थानकादरम्यान पेंटाग्राफमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पश्चिम रेल्वेवरही गाडय़ांच्या रांगा लागल्या होत्या. वाशी स्थानकात लोकलमध्ये बिघाड झाल्याने हार्बर सेवा विस्कळीत झाली. ठाणे स्थानकात अडकून पडलेल्या प्रवाशांची गर्दी उसळली होती. राज्याच्या विविध भागांत पुढील तीन ते चार दिवस पूर्वमोसमी सरी कोसळतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार सोमवारी रात्री साडे नऊ वाजल्यापासून मुंबईच्या अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडटासह पाऊस कोसळला. त्यामुळे घरी परतणाऱ्यांची त्रेधा उडाली.

ठाण्यात मुसळधार

ठाणे : ठाणे, भिवंडी, कळवा, मुंब्रा भागातही मुसळधार पाऊस झाल्याने दोन ते तीन महिन्यांपासून उकाडय़ाने हैराण झालेल्या ठाणेकरांना दिलासा मिळाला. या पहिल्या पावसाचा आनंद लुटण्यासाठी अनेकजण इमारतीखाली उतरले होते. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडल्याने ठाण्यातील वागळे इस्टेट, इंदिरानगर, लोकमान्यनगर, यशोधननगर, सावरकरनगर, नितीन कंपनी, खोपट, ज्ञानेश्वर नगर, कळवा, काल्हेर भागात भागात वीजपुरवठा खंडीत झाला. तर नौपाडा, वंदना, घोडबंदर भागातील रस्त्यांवर पाणी तुंबले.

बदलापुरातही पाऊस

बदलापुरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाल्यामुळे अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये नागरिकांची तारांबळ उडाली. बदलापूरच्या अनेक भागांतील वीजपुरवठा रात्री ८ वाजल्यापासून खंडित झाला होता.

महावितरणला फटका

जोरदार वारा व पाऊस यामुळे महावितरणच्या यंत्रणेला फटका बसला. शहापूर येथे दोन खांब पडले तर डोंबिवलीत सुमारे २३ हजार ग्राहकांना फटका बसला. कल्याण येथेही नुकसान झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.

नवी मुंबईत जोरदार सरी

नवी मुंबई : नवी मुंबईतही सोमवारी रात्री नऊच्या सुमारास जोरदार सरी कोसळल्या. नवीमुंबईत ८ मिली पावसाची नोंद झाली. विजांच्या कडकडाटासह सुमारे तासभर झालेल्या पावसाने सर्वत्र पाणी तुंबले. काही ठिकाणचा वीजपुरवठाही खंडीत झाला. रात्री उशिरापर्यंत रिमझीम सुरूच होती. बेलापूर भागात ४ मिलीमीटर, नेरुळ भागात १०, तर ऐरोली परिसरात १२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

दिव्यात पादचारी पुलावर गोंधळ

दिवा रेल्वे स्थानकातील वीजपुरवठा खंडीत झाल्याने मुंबईच्या दिशेला असलेल्या पादचारी पुलावर गोंधळ उडाला. दिवा स्थानकात ओव्हरहेड वायरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे कल्याणला जाणारी लोकल दिवा स्थानकात १० मिनीटे थांबवण्यात आली होती. याचा परिणाम कल्याणकडे जाणाऱ्या मंदगती मार्गिकेवरील वाहतुकीवर झाला.