नालेसफाईसह अन्य कामे केवळ ५० टक्केच पूर्ण; मेअखेरीस पूर्ण करण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट

मुंबई : करोनाचा वाढता संसर्ग, लागलेली टाळेबंदी व कमी मनुष्यबळ यांमुळे नालेसफाईसह पावसाळापूर्व कामांची गती काहीशी मंदावली असल्याचे दिसत आहे. पावसाळा दीड महिन्यावर येऊन ठेपलेला असताना अद्याप पश्चिम व मध्य रेल्वेवरील पावसाळापूर्व कामे साधारण ४० ते ५० टक्के पूर्ण झाली आहेत. ही कामे मे महिनाअखेरीस पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मध्य व पश्चिम रेल्वेने ठेवले आहे.

रुळावर पाणी साचू नये, झाडाच्या फांद्या ओव्हरहेड वायर किंवा रुळांवर पडून लोकल सेवा विस्कळीत होऊ नये याची तयारी मध्य व पश्चिम रेल्वे पावसाळा सुरू होण्यापूर्वी करते. मात्र गेल्या वर्षी करोना, लागलेली टाळेबंदी व कमी मनुष्यबळातही कामे पूर्ण करण्यावर भर दिला. कामे करणारे कामगार कमी संख्येने उपलब्ध असतानाही रेल्वेने ही कामे पूर्ण केली. मात्र यंदा कामांची गती काहीशी कमी झाल्याचे दिसत आहे. आतापर्यंत १ हजार ३७ छोट्या-मोठ्या नाल्यांपैकी ३७२ नाल्यांची सफाई करण्यात आली आहे, तर ५९८ झाडांपैकी १५४ झाडांच्या फांद्या कापण्याचे काम सुरू आहे. रुळांची उंची वाढवण्याचे कामही केले जात असले तरी मनुष्यबळाअभावी हे काम रखडलेले आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर आतापर्यंत ४० टक्के   कामे पूर्ण झाली असून ६० टक्के कामे मे महिनाअखेरीस पूर्ण करण्याचा दावा प्रशासनाने केला आहे. महत्त्वाच्या ५५ नाल्यांची सफाई पावसाळ्यापूर्वी केली जाते. त्यातील २७ नाल्यांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरित नाल्यांची सफाईही याच महिन्यात पूर्ण केली जाणार असल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी सांगितले.

पाण्याचा निचरा करण्यासाठी सयंत्र

पाणी तुंबणाऱ्या १७ असुरक्षित ठिकाणांवर मध्य रेल्वेने लक्ष केंद्रित केले होते. त्यावेळी मध्य रेल्वेने पालिकांच्या मदतीने पाण्याचा निचरा करण्यासाठी एकूण १४३ पंप बसविले होते. यंदा १५२ पंप मशीन बसवण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसएमटी ते ठाणे, ठाणे ते कल्याण, सीएसएमटी ते मानखुर्द, ठाणे ते तुर्भे, कल्याण ते कर्जत, दिवा ते पनवेल, पनवेल ते रोहा, रोहा ते कर्जत, कल्याण ते इगतपुरी, दिवा ते बोईसर पट्ट्यात हे पंप बसवले जातील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पश्चिम रेल्वे मार्गावर गेल्या वर्षी १०० डिझल आणि इलेक्ट्रिक पंप    बसवण्यात आले होते. या वेळी १२७ पंप बसवले जाणार आहेत. चर्चगेट ते विरार दरम्यानच्या चर्चगेट ते मरिन लाइन्स, माटुंगा रोड ते दादर भागांत अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून वसई ते विरार स्थानकादरम्यानही रुळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे या भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठीही विशेष लक्ष दिल्याची माहिती दिली. या स्थानकादरम्यान रुळांची उंची वाढवण्याचे कामही प्रगतिपथावर असल्याचा दावा केला आहे. ट्रॅक सर्किट, यार्ड, लोकल, सिग्नल इत्यादींची दुरुस्ती, सफाईची कामे हाती घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

बोगद्यांच्या कामावरही लक्ष केंद्रित

कसारा ते इगतपुरीदरम्यान १८ छोटे बोगदे व कर्जत ते लोणावळा दरम्यान ५८ बोगदे असून तेथे गस्तीपथक तैनात केले जाणार आहेत. या भागांतही नालेसफाई व अन्य कामांना गती दिली जात आहे.

सॅण्डहस्र्ट रोड स्थानकात ४०० मीटर लांबीचा भूमिगत नाला

प्रत्येक वर्षी पावसाळ्यात सॅण्डहस्र्ट रोड, मशीद रोड स्थानकात रुळांवर पाणी तुंबते. स्थानकाबाहेरील रस्त्यावर असणारे पाणी हे रुळांवर सोडल्याने पाणी साचण्यास आणखी भर पडते. ही बाब लक्षात आल्यानंतर मध्य रेल्वे व पालिकेकडून सॅण्डहस्र्ट रोड स्थानकात भूमिगत पाइपलाइन टाकण्याचा निर्णय घेतला. सध्या त्याचे काम सुरू आहे. ४०० मीटर लांबीची असलेली पाइपलाइन ही कचरा वाहून नेणारा नालाच असेल. आतापर्यंत २०० मीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे. सॅण्डहस्र्ट रोड पूर्वेकडून भूमिगत पाइपलाइन ही मुंबई पालिकेच्या पी.डी’मेलो रस्त्यापर्यंत नेण्यात येणार आहे. हे काम पूर्ण होताच सॅण्डहस्र्ट रोड ते मशीद रोड स्थानकात पाणी तुंबणार नाही, असा दावा केला जात आहे.