पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे परिसर चकाचक

पूर्व उपनगरातील मुलुंड, कांजूरमार्ग, देवनार या कचराभूमींची पाहणी गुरुवारी स्थायी समितीच्या सदस्यांनी केली. मात्र पाहणीचा दौरा पूर्वनियोजित असल्याने कचराभूमीचा परिसर चकाचक करण्यात आला होता. त्यामुळे येथील नागरिकांना होणारा त्रास आणि दरुगधीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या सदस्यांना ही दरुगधी जाणवलीच नाही. त्यामुळे पाहणीदौरा हा निव्वळ उपचार ठरला. दरम्यान या दौऱ्याच्या वेळी स्थायी समिती सदस्यांना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून काळे झेंडे दाखविले गेले.
पश्चिम उपनगरातील कचरा मुलुंड, कांजूरमार्ग, देवनार येथील कचराभूमीवर टाकण्यास पूर्व उपनगरातील नगरसेवकांनी विरोध केला आहे.
स्थायी समितीत त्यावर चर्चा ही झाली होती. त्यावर या कचराभूमींची पाहणी करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार गुरुवारी हा दौरा झाला. हा दौरा पूर्वनियोजित असल्याचे पालिकेच्या घनकचरा विभागाला माहिती असल्याने गेल्या चार-पाच दिवसांपासून कचराभूमीवरील कचऱ्यावर मातीचा थर टाकण्यात येत होता. कचराभूमीकडे जाणारे रस्तेही चकाचक करण्यात आले होते. त्यामुळे स्थायी समिती सदस्यांना या ठिकाणी दरुगधी जाणवली नाही.