दिवसभर चालणाऱ्या ऑनलाइन वर्गाच्या जाचाला कंटाळलेल्या पालक आणि विद्यार्थ्यांना मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिलासा दिला आहे. पूर्वप्राथमिक वर्गासाठी अर्धातास, पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी दीड तास आणि नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन तास अशी रोजची कालमर्यादा मंत्रालयाने निश्चित केली आहे.

ऑनलाइन वर्गाची शाळांकडून होणारी सक्ती, खूपवेळ विद्यार्थी संगणक किंवा मोबाईल हाताळत असल्यामुळे निर्माण होणाऱ्या शारिरीक आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे पालक त्रासले आहेत. याबाबत पालक संघटनांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. बालहक्क आयोगाकडेही तक्रारी करण्यात आल्या आहेत. या सर्वाची दखल घेऊन मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ऑनलाइन शिक्षणाबाबत मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यानुसार पूर्वप्राथमिक ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वर्गाचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

शिक्षकांनाही दिलासा

शिक्षकांवर ताण येईल इतक्या ऑनलाइन तासिका घेण्याचे काम देऊ नये, असे मंत्रालयाने म्हटले आहे. शिक्षकांच्या मुलांच्याही ऑनलाइन शाळा असतील. त्यासाठी त्यांना संगणक किंवा फोन वापरावा लागू शकतो, याचा विचार करून त्यांच्या कामाचे नियोजन करावे. दिवसातून एका शिक्षकाला २ किंवा ३ तासांपेक्षा अधिक काळ ऑनलाइन तासिका घेण्याचे बंधन घालू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

ऑनलाइन शिक्षण हे अपंग विद्यार्थ्यांसाठी जिकीरीचे ठरत आहे. राष्ट्रीय मुक्त विद्यालयाने अशा विद्यार्थ्यांसाठी ई-साहित्य तयार केले आहे. कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी सांकेतिक भाषांतील २५० चित्रफितींची निर्मिती केली आहे. अंध विद्यार्थ्यांसाठीही पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

वर्गाची वेळमर्यादा

* पूर्वप्राथमिकच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वर्गाची वेळमर्यादा दिवसाला जास्तीत जास्त ३० मिनिटे निश्चित करण्यात आली. पालकांच्या उपस्थितीतच हे वर्ग होणे अपेक्षित आहे.

* पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एक तासिका ३० ते ४५ मिनिटांची आणि दिवसातून दोन तासिका घेण्यास परवानगी आहे.

* नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही एक तासिका ३० ते ४५ मिनिटांची याप्रमाणे दिवसातून ४ तासिका घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.

* दोन तासिकांदरम्यान ५ ते १० मिनिटांचा वेळ विद्यार्थ्यांना द्यायचा आहे.

* आठवडाअखेरीस किंवा सुट्टीच्या दिवशी ऑनलाइन वर्ग घेऊ नयेत.