सोमवारी राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाने चांगलीच विश्रांती घेतली असली तरी पुढील दोन दिवसात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

बंगालच्या उपसागरात वायव्येला कमी दाबाचा पट्टा पूर्ण झाल्याने पश्चिम किनारपट्टी, घाटमाथा व मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागातून सोमवारी देण्यात आली.

पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्य़ात घाटमाथ्यावर काही ठिकाणी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात काही ठिकाणी मुसळधार (६५ मिमी) ते अतिमुसळधार (२०० मिमीपर्यंत) पावसाची शक्यता आहे. विदर्भात गडचिरोली, भंडारा, चंद्रपुर, गोदिंया या जिल्ह्य़ांना मंगळवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

सोमवारी दिवसभरात घाटमाथ्यावरील पावसाचे प्रमाण मर्यादित राहीले. महाबळेश्वर येथे ६८.२ मिमी, गगनबावडा ४४.० मिमी, राधानगरी ३८ मिमी पावसाची नोंद झाली.

पावसाची सरासरी

कोल्हापूर-सांगली जिल्ह्य़ात महापूरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असली तरी या मोसमात सोलापूर, बीड, जालना, परभणी, लातूर, वाशिम, यवतमाळ आणि गोंदिया या जिल्ह्य़ांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. कोल्हापूर, सातारा, पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्य़ांमध्ये सरासरीपेक्षा ६० टक्क्य़ांहून अधिक पाऊस पडला. तर मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, जळगाव, सांगली जिल्ह्य़ांमध्ये सरासरीपेक्षा २० ते ५९ टक्के पाऊस नोंदवण्यात आला. उर्वरित महाराष्ट्रात सरासरीइतकाच पाऊस झाला.