प्रीती राठी अॅसिड हल्ला प्रकरणी आरोपी अंकुर पानवरची फाशी मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आली आहे. अॅसिड हल्ला प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेला देशातील हा पहिला खटला होता. आरोपीला दोषी ठरवत न्यायलयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अंकुश पनवारने एकतर्फी प्रेम प्रकरणातून प्रीती राठीवर अॅसिड हल्ला केला होता. यामध्ये उपचारादरम्यान मुंबईत प्रीतीचा मृत्यू झाला होता. २०१६ रोजी मुंबई सत्र न्यायालयाने आरोपी अंकुर पनवारला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली होती. न्यायालयाने कलम ३०२ आणि कलम ३२६ ब अंतर्गत अंकुरला दोषी ठरवले होते.

नौदलाच्या रुग्णालयात नोकरीसाठी रुजू होण्यासाठी हरियाणाची प्रीती राठी दिल्लीहून २ मे २०१३ रोजी मुंबईत आली होती. गरीबरथ एक्सप्रेसमधून वांद्रे टर्मिनस स्थानकात ती कुटुंबियासमवेत उतरत असताना अंकुर पनवारने तिच्या चेहऱ्यावर जवळून अ‍ॅसिड फेकले होते. सुरूवातीला तिला भायखळ्याच्या मसिना रुग्णालयात दाखल केले होते. या अ‍ॅसिड हल्ल्यात तिने डावा डोळा गमावला होता. तर उजव्या डोळ्याची दृष्टीही कमकुवत झाली होती. प्रकृती बिघडल्यानंतर तिला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. १७ डॉक्टरांचे पथक तिच्यावर उपचार करत होते.

अ‍ॅसिड पोटात गेल्याने तिची अन्ननलिका जळाली होती. तसेच तिचे एक फुफ्प्फुसही निकामी झाले होते. दररोज रक्तस्त्राव होत असल्याने तिला दररोज पाच ते सहा बाटल्या रक्त चढविण्यात येत होते. प्रकृती सुधारत नसल्याने तिच्यावर मोठी शस्त्रक्रियादेखील शक्य होत नव्हती. त्यातच मूत्रपिंडाचाही त्रास सुरू झाला होता व हिमोग्लोबिनचे प्रमाणही कमी झाले होते. मात्र, शर्थीचे प्रयत्न करूनही प्रीतीचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले होते.