News Flash

करोनाकाळात गर्भवतींच्या मृत्यूचे प्रमाण अधिक

गर्भवती व नवजात बाळांच्या आरोग्यासाठी संबंधित महापालिकांनाही सूचना दिल्या होत्या.

|| संदीप आचार्य

‘लॅन्सेट’मधील संशोधन लेख

मुंबई : करोनाकाळात वेगवेगळ्या कारणांमुळे गर्भवती महिलांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली तसेच जन्मत: अर्भक मृत असण्याचे प्रमाणही जास्त असल्याचे दिसून आले आहे.   ‘लॅन्सेट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधन लेखातून ही बाब स्पष्ट झाली असून प्रामुख्याने भारतासह विकसनशील देशात गर्भवती महिलांचे करोनाकाळातील मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे ‘लॅन्सेट’मधील प्रसिद्ध झालेल्या लेखात म्हटले आहे. महाराष्ट्रातही संपूर्ण आरोग्य यंत्रणा करोना रुग्णोपचारात गुंतल्यामुळे गर्भवती महिलांचे मृत्यू अधिक झाल्याचे आरोग्य विभागातील ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले.

एकूण १७ देशांत ४० अभ्यासगटांनी याबाबत गोळा केलेल्या तपशिलातून करोनाकाळातील गर्भवतींचे जास्त मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून बुधवारी ‘लॅन्सेट’मधून ही बाब प्रसिद्ध करण्यात आली आहे. करोनाबाधित गर्भवती महिला तसेच वेगवेगळ्या संसर्गाने आजारी असलेल्या महिला, त्यांचे मानसिक स्वास्थ्य तसेच त्यांना वेळेवर योग्य उपचार मिळण्यात आलेले अडथळे या सर्वाचा विचार या अभ्यासात करण्यात आला आहे.   यात अभ्यासकांना प्रामुख्याने अल्प व मध्यम उत्पन्न असलेल्या देशात आरोग्यव्यवस्थेत करोनामुळे निर्माण झालेल्या उपचारातील अडचणी तसेच संसर्गाच्या भीतीमुळे अनेक गर्भवती महिलांचे तसेच अर्भक जन्मत: मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. जवळपास बाराहून अधिक अभ्यासांत जन्मत: अर्भक मरण पावल्याच्या प्रमाणात २८ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले, तर गर्भवती असताना तसेच बाळंतपणाच्या काळात मेक्सिको व भारतात महिलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले. तसेच गर्भारपणाच्या काळात आणि बाळंतपणानंतर नैराश्य व चिंताग्रस्त होण्याचे महिलांमधील प्रमाण वाढल्याचे लेखात नमूद केले आहे.

महाराष्ट्रात गर्भवती महिला व नवजात बालकांची करोनाकाळात विशेष काळजी घेण्यासंदर्भात आरोग्य विभागाने ज्येष्ठ डॉक्टरांची समिती स्थापन केली होती. या समितीच्या शिफारशींनुसार गर्भवती महिलांची जास्तीत जास्त काळजी घेण्यात आल्याचे आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्रात करोना प्रादुर्भाव वाढू लागताच गर्भवती, बालआरोग्य तसेच लसीकरणासह आरोग्य विभागाच्या उपक्रमांच्या अंमलबजावणीचा नियमित आढावा घेऊन योग्य ती काळजी घेण्यास संबंधितांना सांगितले जात होते, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

गर्भवती व नवजात बाळांच्या आरोग्यासाठी संबंधित महापालिकांनाही सूचना दिल्या होत्या. आवश्यकतेनुसार खासगी रुग्णालयांची मदत घेण्यासही सांगण्यात आले होते, तथापि काही परिणाम निश्चित झाला असणार, असे डॉ. व्यास यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2021 1:43 am

Web Title: pregnant mortality is higher during the coronary period akp 94
Next Stories
1 अतिदक्षता खाटा ८ टक्के, तर व्हेंटिलेटर खाटा ७ टक्केच शिल्लक
2 मुंबईत आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ
3 करोनाबाधितांच्या सेवेसाठी ‘विभागीय नियंत्रण कक्ष’
Just Now!
X