डॉक्टरला कारावासाची शिक्षा

प्रसूतीदरम्यान उपचारात हलगर्जीपणा केल्यामुळे झालेल्या मृत्यूप्रकरणी माहीम येथील ‘सूरलता’ रुग्णालयातील डॉ. शरद गोगटे यांना वांद्रे महानगरदंडाधिकाऱ्यांनी दोषी ठरवले आहे. तसेच त्यांना तीन महिन्यांच्या कारावासासह ५० हजार रुपयांचा दंड सुनावला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे मुलुंड येथील सरसीज शेटे कुटुंबीयाला १६ वर्षांच्या न्यायालयीन लढय़ानंतर अखेर न्याय मिळाला आहे.

सरसीज यांची पत्नी सुनीता यांना दुसऱ्यांदा गर्भधारणा झाल्यानंतर त्यांनी माहीम येथील ‘सूरलता’ रुग्णालयात नाव नोंदवले होते आणि १ ऑक्टोबर २००० ही प्रसूतीची तारीख त्यांना देण्यात आली होती. मात्र वेळेपूर्वीच सुनीता यांना प्रसूतीवेदना सुरू झाल्याने २१ सप्टेंबर २००० रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच त्यांच्यावर रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ असलेल्या डॉ. गोगटे यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते.

त्या वेळेस त्यांची प्रकृती चांगली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊच्या सुमारास शेटे हे पत्नीला भेटण्यासाठी रुग्णालयात गेले, तेव्हा सुनीता यांना ‘सिझेरियन’साठी नेण्यात आल्याचे आणि सलायन लावण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यावेळी सुनीता यांच्यासोबत केवळ एकच आया उपस्थित होती. थोडय़ाच वेळाने सुनीता यांना अस्वस्थ वाटू लागल्याने शेटे यांनी रुग्णालयाच्या इमारतीतच राहत असलेल्या डॉ. गोगटे यांच्याकडे धाव घेतली. मात्र तातडीने येतो असे सांगणारे डॉ. गोगटे तास उलटल्यानंतर ऑपरेशन थिएटरमध्ये दाखल झाले. परंतु सुनीता या तोपर्यंत बेशुद्ध झाल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी सुनीता यांचे निधन झाल्याचे डॉ. गोगटे यांनी शेटे यांना सांगितले.

डॉ. गोगटे यांनी सुनीता यांच्यावर उपचारात हलगर्जीपणा केल्याने त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप शेटे यांनी तक्रारीत केला होता. अखेर १६ वर्षांनंतर महानगरदंडाधिकाऱ्यांनी  निकाल देत डॉ. गोगटे यांना सुनीताच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरवून शिक्षा सुनावली.  वर्षभरापूर्वीच ग्राहक न्यायालयाने डॉ. गोगटे यांना दोषी ठरवत २० लाख रुपयांच्या नुकसानभरपाईचे आदेश दिले होते. त्याला डॉ. गोगटे यांनी राष्ट्रीय ग्राहक आयोगाकडे आव्हान दिले असून प्रकरण प्रलंबित आहे.