X

विरारमध्ये गरोदर महिलेची पतीसह गळफास घेऊन आत्महत्या

रोहन व कांचना यांनी वेगवेगळ्या ओढणीच्या साहाय्याने एकत्र गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.

विरार येथे एका दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी संध्याकाळी ही घटना उघडकीस आली. रोहन आणि कांचना सिंग अशी मयत दाम्पत्याची नावे आहेत. कांचना ही नऊ महिन्यांची गरोदर होती. कर्जबाजारीपणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांना वर्तवली आहे.

विरार पूर्वेच्या कोपरी येथील विघ्नहर्ता पार्क इमारतीत रोहन सिंग (वय २८) आणि कांचना सिंग (२४) हे दाम्पत्य राहतात. मृत कांचना ही इमारतीत पाणी सोडण्याचे काम करते. तर रोहन बेरोजगार होता. मंगळवारी सकाळी इमारतीत पाणी आले नव्हते. पाणी का सोडले नाही, हे विचारण्यासाठी इमारतीचे रहिवाशी त्यांच्या घरी गेले असता आतून दार बंद होते. त्यामुळे रहिवाशांना संशय आला. त्यांनी दार तोडून आत प्रवेश केला असता, रोहन व कांचना यांनी वेगवेगळ्या ओढणीच्या साहाय्याने एकत्र गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. कांचना ही ९ महिन्यांची गरोदर होती. कर्जबाजारीपणामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता विरार पोलिसांनी वर्तवली आहे. मागील ३ वर्षापासून ते या इमारतीत राहत होते. त्यांचे नातेवाईक आल्यावर आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.