अभिनेता सलमान खान याच्यासोबतचे भ्रमणध्वनीवरील संभाषण प्रसिद्ध करणाऱ्या इंग्रजी सायंदैनिकाविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करून सात वर्षे उलटली तरी प्रकरणाच्या सुनावणीची स्थिती ‘तारीख पे तारीख’वरच अडकल्याने संतापलेली अभिनेत्री प्रीती झिंटा ही मंगळवारी गिरगाव महानगरदंडाधिकारी न्यायालयातून त्रागा करीत तडकाफडकी निघून गेली.
उलटतपासणीसाठी प्रीती न्यायालयासमोर हजर झाली होती. मात्र या खेपेसही खटल्याच्या सुनावणीला पुढची तारीख पडल्याने ती संतापली. तिने न्यायालयाकडे आपली नाराजीही व्यक्त केली. उलटतपासणीसाठी प्रीती साक्षीदाराच्या पिंजऱ्यात जाऊन उभी राहताच बचाव पक्षाच्या वकिलांनी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती न्यायालयाकडे केली. त्यातच बचाव पक्षाच्या वकिलांकडून मराठी भाषेतून न्यायाधीशांशी संभाषण साधले जात असल्याने मराठी न कळणाऱ्या प्रीतीने त्याबाबत न्यायालयाला सांगितले. तसेच मला मराठी नीटसे कळत नसल्याने कृपया हिंदूी वा इंग्रजीतून बोलावे, अशी विनंती तिने बचाव पक्षाच्या वकिलांना केली. त्यावर मॅडम, आपण महाराष्ट्रात राहतो तर थोडीफार मराठी भाषा यायला हवी, असे तिला सुनावले.
 त्यामुळे ती अधिक संतापली. त्यानंतर न्यायालयानेही बचाव पक्षाची विनंती मान्य करून सुनावणी तहकूब करीत असल्याचे सूचित केल्यानंतर प्रीतीने आपल्याला पुढील महिन्यात चित्रिकरणामुळे सुनावणीसाठी येता येणार नसल्याचे न्यायालयाला सांगितले. तसेच बुधवारी किंवा गुरुवारी सुनावणी ठेवण्याची विनंती न्यायालयाकडे केली. परंतु बचाव पक्षाने कागदपत्रांच्या अभ्यासासाठी आणखी वेळ मागितल्यानेन्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी १५ फेब्रुवारी रोजी ठेवण्याचे स्पष्ट केले.
 या सगळ्यामुळे प्रीती अधिकच संतापली. गेल्या सात वर्षांपासून आपण प्रत्येक सुनावणीसाठी हजर राहत आलो आहोत आणि न्यायालय मात्र सुनावणी सतत तहकूब करते, असा नाराजीचा सूर तिने आळवला. त्यावर न्यायालयाने तुम्ही नेहमी हजर राहत नसल्याचे सुनावले.