News Flash

प्रीमियम गाडय़ांची दमछाक

गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या गर्दीचा विचार करून या मार्गावर प्रीमियम गाडय़ा चालवण्याचे रेल्वेचे धोरण प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे पुरते फसले आहे.

| September 4, 2014 02:48 am

गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या गर्दीचा विचार करून या मार्गावर प्रीमियम गाडय़ा चालवण्याचे रेल्वेचे धोरण प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे पुरते फसले आहे. परतीच्या प्रवासावेळीही हा अल्प प्रतिसाद कायम राहिला, तर नाईलाजाने आम्हाला या गाडय़ा बंद कराव्या लागतील, असा इशारा कोकण रेल्वे प्रशासनाने दिला आहे.
खासगी बसगाडय़ांच्या तुलनेत प्रीमियम गाडय़ांचे तिकीट खूपच स्वस्त असल्याने प्रवाशांनी या गाडय़ांमार्फत प्रवास करावा, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. मुंबईहून ऐन गर्दीच्या वेळी कोकणात जाणाऱ्या या प्रीमियम गाडय़ा ७५ ते ८० टक्के रिकाम्याच धावल्या.
कोकण रेल्वेवर गणेशोत्सवादरम्यान पहिल्यांदाच डबलडेकर गाडी धावणार म्हटल्यावर मुंबईतील चाकरमान्यांमध्ये उत्साह होता. मात्र ही गाडी प्रीमियम म्हणून चालवण्याचे घोषित झाले आणि त्यापाठोपाठ एकेका तिकिटाला साडेतीन ते चार हजार रुपये मोजावे लागल्यानंतर प्रवाशांनी या गाडीचा धसका घेतला. २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत वातानुकुलित डबलडेकर, शताब्दी आणि प्रीमियम वातानुकुलित गाडी या तीन गाडय़ांना अनुक्रमे १८.९८, २४.२५ आणि २५.४८ टक्केच आरक्षण होते. त्यामुळे या गाडय़ा चालवणे नुकसानीचे आहे, असे सांगत गाडय़ांना प्रतिसाद मिळाला नाही, तर त्या नाईलाजाने बंद कराव्या लागतील, असा इशारा कोकण रेल्वेने दिला. कोकणात जाण्यासाठी प्रवाशांनी खासगी बसगाडय़ांची तिकिटे अगदी पाच ते सहा पट चढय़ा दराने विकत घेतली होती.“रस्त्यावरील प्रवासापेक्षा रेल्वेप्रवास नेहमीच वेगवान आहे. तसेच या सर्व प्रीमियम गाडय़ांची तिकिटे अगदी आत्तापर्यंत करमाळीपर्यंतही १२००-१३०० रुपयांच्या घरात उपलब्ध आहेत. या तिकीट खर्चात खाण्यापिण्याचा खर्चही धरला जातो. त्यामुळे खासगी बसपेक्षा प्रीमियम गाडय़ांचा पर्याय केव्हाही चांगला आहे. आता किमान परतीच्या प्रवासासाठी तरी कोकणवासीयांनी प्रीमियम गाडय़ांचे आरक्षण करून वेगवान प्रवासाची खात्री बाळगावी. “
– वैशाली पतंगे, मुख्य जनसंपर्क अधिकारी (कोकण रेल्वे)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2014 2:48 am

Web Title: premium train to konkan in ganesh festival
टॅग : Ganesh Festival
Next Stories
1 रद्दीच्या दुकानात जिवंत काडतुसे सापडली
2 मृत्यूच्या दाढेतून स्वप्नाली घरी परतली..
3 शीव रुग्णालयातील खोलीचे छत कोसळले
Just Now!
X