शिवसेनेबरोबरील युतीचा निर्णय पक्ष घेईल. तुम्ही स्वबळाच्या तयारीला लागा, अशी सूचना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांना दिला आहे. त्याचप्रमाणे एक बूथ २५ युथ नुसार नेमणुका करण्यासही त्यांनी पक्ष विस्तारकांना सांगितले आहे.

शाह हे रविवारी संपर्क फॉर समर्थन अंतर्गत ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांना भेटण्यासाठी तसेच महाराष्ट्र आणि गोव्यातील विस्तारक, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी बूथ प्रमुखला २३ सूत्री कानमंत्र दिला.

प्रत्येक बूथ सदस्य किमान पाच कुटुंबांच्या संपर्कात असेल. त्याच्याकडे दुचाकी असावी. प्रत्येक बूथचे व्हॉट्सअप ग्रूप असावेत. बूथ सदस्यांनी सर्व धार्मिक आणि राष्ट्रीय सण बूथ पातळीवर साजरे करावेत, लोकांना सहभागी करून घ्यावे. मतदार यादीत संपर्कात असलेल्या सर्व कुटुंबीयांची नोंद करून घ्यावी. त्यांना मतदानासाठी बाहेर काढावे. किमान ५१ टक्के मतदान होईल यासाठी कष्ट घ्यावेत. सर्व शासकीय योजना जनतेपर्यंत न्यावेत. त्यांना त्याचा लाभ मिळेपर्यंत पाठपुरावा करावा. भाजपाच्या मतदारांची तीन गटात वर्गवारी करण्यासही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपली कामे होतीलच अशी अपेक्षा ठेऊ नये, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत.

दरम्यान, अमित शाहंनी लता मंगेशकर यांची भेट घेऊन सरकारच्या यशस्वी कामगिरीची माहिती दिली. त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चाही केली. गत दौऱ्यातच अमित शाह हे लता मंगेशकर यांची भेट घेणार होते. परंतु, काही कारणास्तव त्यांची भेट होऊ शकली नव्हती. त्यामुळे अमित शाहंनी आज त्यांची भेट घेतली.