मुंबईतील गणेश विसर्जन सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी दरवर्षी मोठय़ा संख्येने परदेशी पर्यटक मुंबईत गर्दी करतात. त्यांच्या सोयीसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि मुंबई महानगरपालिका यांच्यातर्फे गिरगाव चौपाटीवर खास सज्जा उभारण्यात येणार आहे. साधारण ३०० पेक्षाही अधिक व्यक्तींना सामावून घेण्याची क्षमता या ठिकाणी असेल.

पर्यटक ज्या हॉटेलमध्ये राहात असतील तिथून चौपाटीपर्यंत जाण्यासाठी बससेवाही पुरवण्यात येणार आहे. तसेच शुद्ध पेयजल, अल्पोपहार आणि फिरत्या स्वच्छतागृहांचीही सोय पर्यटकांसाठी केली जाईल. यात सहभागी व्हायचे असल्यास परदेशी पर्यटकांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल.

‘१२६ वर्षांची दीर्घ परंपरा असलेल्या गणेशोत्सवाला जगाच्या नकाशावर स्थान मिळवून देणे हा या योजनेमागचा उद्देश असून यानिमित्ताने जगभरातील पर्यटक महाराष्ट्रात आकर्षित होतील,’ असा विश्वास महाराष्ट्र पर्यटन खात्याचे मुख्य सचिव विजय कुमार गौतम यांनी व्यक्त केला. ‘महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन परदेशी पर्यटकांना घडवताना अत्यंत आनंद होत आहे. या माध्यमातून त्यांना गणेश विसर्जनाच्या भव्य सोहळ्याचा अनुभव घेता येईल,’ असे राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल म्हणाले.