ऑगस्ट महिन्यापासून महाविद्यालयांचे ऑनलाइन वर्ग सुरू करण्यासाठी चाचपणी करण्यात येत असून विद्यापीठ अनुदान आयोगाने यापूर्वी दिलेल्या वेळापत्रकानुसार वर्ग सुरू करण्याबाबत उच्चशिक्षण विभागाने विद्यापीठ आणि महाविद्यालयांना सूचना दिल्या आहेत. त्याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार मात्र विद्यापीठांवर सोपवण्यात आले आहेत.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या २९ एप्रिलच्या सूचनेनुसार १ ऑगस्टपासून द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्षांचे वर्ग सुरू होणे अपेक्षित आहे. त्यानंतर आयोगाने ६ जुलै रोजी सुधारित सूचना दिल्या. मात्र, त्यात परीक्षांबाबत स्पष्टता करून पुढील वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत २९ एप्रिलच्या सूचना ग्राह्य़ धरून विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी १ ऑगस्टपासून वर्ग सुरू करण्याची तयारी केली आहे. ऑनलाइन शिक्षणाबाबत विद्यापीठे आणि महाविद्यालयांची तयारी किती आहे याचा आढावा उच्चशिक्षण विभागाने नुकताच घेतला. मुंबई विद्यापीठाशी संलग्न काही महाविद्यालयांनी ऑनलाइन शिक्षणाची यंत्रणा उभी केली आहे. काही महाविद्यालयांनी वर्ग सुरूही केले आहेत.

परीक्षांना मात्र विरोध?

शक्य तेथे ऑनलाइन वर्ग सुरू करण्यासाठी उच्चशिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. तशा सूचनाही महाविद्यालयांना दिल्या जात आहेत. असे असताना ऑनलाइन परीक्षा मात्र शक्य नसल्याची भूमिका विभागाने सातत्याने घेतली आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठे स्वायत्त असल्यामुळे परीक्षांचा नाही तरी वेळापत्रक ठरवण्याचे स्वातंत्र्य विद्यापीठांना देण्यात आले आहे.

आयोगाच्या सूचनांनुसार ऑगस्टपासून महाविद्यालये सुरू होणे अपेक्षित आहे. त्याचे वेळापत्रक ठरवण्याचे अधिकार विद्यापीठांना आहेत. परीक्षांबाबतचा निर्णय आपत्ती व्यवस्थापन कक्षाने घेतला आहे.’

– धनराज माने, संचालक, उच्चशिक्षण