डॉक्टरांनी दिलेल्या चिठ्ठीशिवाय (प्रिस्क्रिप्शन) औषधे मिळणार नाहीत, ही भीती औषधविक्रेत्यांनी पसरवली असून त्यात कोणतेही तथ्य नाही, असे अन्न आणि औषध प्रशासनाकडून (एफडीए) स्पष्ट करण्यात आले आहे. औषधविक्रेत्यांनी सातत्याने संपाचे हत्यार उगारू नये, असे आवाहन करतानाच संपकरी विक्रेत्यांवर कारवाईचे संकेतही देण्यात आले आहेत. एफडीएच्या कारवाईविरोधात औषधविक्रेत्यांनी १६ ते १८ डिसेंबर दरम्यान संप पुकारला आहे.  
औषध आणि सौंदर्यप्रसाधन कायद्याने ठरवून दिलेल्या काही सूचित (शेडय़ुल्ड) औषधांसाठी डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन देणे गरजेचे आहे. इतर औषधे प्रिस्क्रिप्शनशिवायही मिळू शकतात. मात्र, अनियमिततेविरोधात एफडीए करत असलेल्या कारवाईबद्दल नाराजी पसरवण्यासाठी औषधविक्रेत्यांकडून गैरसमज पसरवले जात आहेत. सर्वच औषधांसाठी प्रिस्क्रिप्शन आवश्यक नाही, असे एफडीएचे आयुक्त महेश झगडे यांनी सांगितले.
एफडीए जाचक नियम लावत असून विक्रेत्यांविरोधात गुन्हे दाखल करत आहे, या कारणावरून यापूर्वीही विक्रेत्यांनी एक दिवसाचे लाक्षणिक संप पुकारले होते. मूलभूत सुविधा नसलेल्या देशात नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे शक्य नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. सातत्याने संपाचे हत्यार उगारणाऱ्या औषधविक्रेत्यांनी संप करू नये, असे आवाहन एफडीएकडून करण्यात आले आहे. संप होऊ नये यासाठी एफडीए प्रयत्न करणार असून संपकरी विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे झगडे यांनी स्पष्ट केले.