अहंकाराने राज्य चालवू नका, अशा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देताच आम्ही दिवसाची कामे रात्री केली नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी विधानसभेत फडणवीस यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनात मंगळवारी आजी-माजी मुख्यमंत्र्यांमधील खडाजंगी गाजली. करोना परिस्थिती हाताळण्यावरून फडणवीस यांनी ठाकरे यांना लक्ष्य करीत ५०० जणांचा मृत्यू लपविल्याचा आरोप केला.

आरे कारशेड आणि आधीच्या सरकारच्या काळातील काही योजना बंद करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी ठाकरे यांना अहंकाराने राज्य चालवू नका, असे खडसावले. तसेच करोना परिस्थिती हाताळण्यावरून ठाकरे सरकारवर यथेच्छ टीका के ली. १४ मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले तेव्हा राज्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या फक्त २६ होती आणि आता ही संख्या साडेनऊ लाखांवर गेली. ५०० च्या आसपास मृत्यू लपविण्यात आले. करोनाच्या काळात नातेवाईक, ठेकेदारांच्या माध्यमातून टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार झाला, असा आरोपही फडणवीस यांनी केला.

फडणवीस यांना केलेल्या आरोपांना मुख्यमंत्र्यांनी तितकेच जोरदार प्रत्युत्तर दिले. काम करताना अहंकार नको, अशी अपेक्षा व्यक्त करता. पण तुम्ही काय केलेत. प्रत्येक गोष्टीत ‘शॉर्टकट’ शोधत दिवसाची कामे रात्री केलीत, असा टोला आरेमधील वृक्षतोडीवरून ठाकरे यांनी लगावला. दिवसाची कामे रात्री केल्यावर काय होते, याची अजितदादांना चांगलीच कल्पना आहे, असा चिमटाही त्यांनी काढला. करोना परिस्थिती सरकारने योग्यपणे हाताळल्याचा दावा करीत माझे कुटुंब, माझी जबाबदारी या नव्या अभियानासाठी विरोधकांना सहकार्याचे आवाहन ठाकरे यांनी केले.