दानवेंच्या उपस्थितीतीत मुख्यमंत्र्यांची टिप्पणी

औरंगाबाद : ‘व्यासपीठावर उपस्थित माझे आजी-माजी आणि एकत्र आलो तर भावी सहकारी’ असा उल्लेख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद जिल्हा परिषद इमारतीच्या भूमीपूजन कार्यक्रमात केल्यामुळे राजकीय पटलावर नव्या चर्चेस तोंड फुटले आहे. या वेळी व्यासपीठावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व इतर काही भाजप नेते उपस्थित होते.

‘आजी-माजी-भावी’ या टिप्पणीवर पत्रकार परिषदेत पुन्हा भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले, की ‘राजकारणाचे स्वरूप विकृत झाले आहे. पदाचा अहंकार न ठेवता राजकारण व्हायला हवे, असे म्हणायचे होते.’ आजी-माजी आणि भावी सहकारी यावरच्या चर्चेबद्दल बोलताना मिश्किल टिप्पणी करत ते म्हणाले, ‘बरोबर थोरात आणि चर्चा जोरात’. या वेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात त्यांच्या शेजारी बसले होते.

औरंगाबाद येथे मराठवाडा मुक्ती दिनानिमित्तच्या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर जिल्हा परिषदेच्या इमारतीचे भूमीपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना उद्देशून मराठवाडा रेल्वेने जोडण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाबरोबरच वेगवान रेल्वे सुरू करण्याची चाचपणी करण्यास सुरूवात झाल्याचे दानवे यांनी गुरुवारी सांगितले होते. या नव्या बुलेट रेल्वे प्रकल्पास राज्य सरकारचे पूर्ण सहकार्य असेल, असे ठाकरे यांनी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

राज्यातील रेल्वेच्या प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकारचा हिस्सा प्रत्येकी ५० टक्के असावा असे सूत्र आहे. पण राज्य सरकारने अशी रक्कम देण्यास नकार दिल्याने सर्व प्रकल्प रखडले असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावर मुख्यमंत्री म्हणाले, की असे काही झाल्याचे माझ्या कानावर आलेले नाही.

औरंगाबाद येथील दिल्ली-मुंबई औद्योगिक या पंचतारांकित वसाहतीचीही मुख्यमंत्री ठाकरे यांनी पाहणी केली. या वसाहतीची जाहिरात देशभर आणि परदेशात करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. आपण हे अगदी मनापासून बोलत आहोत, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.

युतीच्या संकेताचा प्रस्ताव असा नाही. जे काही जाहीरपणे बोलले त्यावरून चर्चा घडेल. वातावरण निर्माण होईल. ते कसे बदलते हे पाहू. पण भाजप- सेनेची युती अनेक वर्षे होती. राज्यातील जनतेनेही युतीला कौल दिला होता. आता शिवसेनेने काँगे्रस- राष्ट्रवादीबरोबर सरकार बनविले आहे. पण नव्या संकेतांने काही घडलेच तर राज्यातील जनतेला ते नक्की आवडेल. पण असे प्रस्ताव जाहीरपणे दिले जात नाहीत. मुंबईत चर्चेला गेलो आणि बोलून काही घडते का ते पाहू.    – रावसाहेब दानवे, केंद्रीय रेल्वे मंत्री