रुग्णालयात उपचार घेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आदींनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.
गेल्या आठवडय़ात नवी दिल्लीतील निवासस्थानी घसरून पडल्याने पवार यांच्या पायाचे हाड फॅक्चर झाले. पवार यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, सध्या त्यांच्यावर ब्रिच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पवार यांनी ७५व्या वर्षांत पदार्पण केल्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या वतीने राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रफुल्ल पटेल, अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे आदी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रुग्णालयात जाऊन पवार यांना शुभेच्छा दिल्या. पवार यांना अजून दोन दिवस रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे.