22 November 2017

News Flash

मंत्री, राष्ट्रवादीचे नेते भुजबळांच्या भेटीला

रुग्णवाहिकेतून आलेल्या भुजबळांची सर्वपक्षीय आमदारांनी भेट घेतली

विशेष प्रतिनिधी, मुंबई | Updated: July 18, 2017 4:59 AM

मतदानासाठी तुरुंगाबाहेर आलेल्या छगन भुजबळ यांची धनंजय मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांनी भेट घेतली.

राज्यातील २८७ आमदारांचे मतदान, एक गैरहजर

राष्ट्रपतिपदासाठी झालेल्या निवडणुकीत २८७ आमदार आणि राज्यसभेच्या एका खासदाराने विधान भवनात सोमवारी मतदान केले. सध्या तुरुंगात असलेल्या छगन भुजबळ आणि रमेश कदम या राष्ट्रवादीच्या दोन आमदारांनी न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तात येऊन मतदान केले. रुग्णवाहिकेतून आलेल्या भुजबळांची सर्वपक्षीय आमदारांनी भेट घेतली तर राष्ट्रवादीची सारी मंडळी त्यांच्या बरोबरच होती.

राज्य विधानसभेतील २८८ पैकी बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर वगळता उर्वरित सर्व आमदारांनी मतदान केले. राज्यसभेचे सदस्य संजय काकडे यांनी विधान भवनातच मतदान केले. सकाळी सर्वप्रथम भाजपच्या पुण्याच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी मतदान केले, तर सर्वात शेवटी संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी मतदान केले.

गैरव्यवहारांच्या आरोपांवरून सध्या तुरुंगात असलेले छगन भुजबळ आणि रमेश कदम या राष्ट्रवादीच्या दोन आमदारांना पोलीस बंदोबस्तात विधान भवनात आणण्यात आले होते. भुजबळ यांना शासकीय रुग्णवाहिकेतून आणण्यात आले. त्यांची प्रकृती चांगली नसल्याने बरोबर डॉक्टरांचे पथक तैनात करण्यात आले होते.भुजबळ आले तेव्हा प्रवेशद्वारापाशी जयंत पाटील, धनंजय मुंडे, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ आदी राष्ट्रवादीची मंडळी उपस्थित होती. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व अन्य नेत्यांनी त्यांची भेट घेतली. जलसंपदामंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, शिवसेनेचे अनिल परब आणि प्रकाश सुर्वे, भाजपचे राम कदम आदींनी भुजबळांची विधानभवनात भेट घेतली. भुजबळांना परत नेत असतानाच अजित पवार त्यांच्या भेटीला आले. त्याच वेळी काँग्रेसचे निरीक्षक मनीष तिवारी व अन्य नेते बाहेर पडत होते. काँग्रेस नेत्यांनीही मग भुजबळांकडे चौकशी केली. ‘मी निर्दोष असून त्यातून बाहेर पडेन,’ असा विश्वास भुजबळांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांजवळ व्यक्त केला. राष्ट्रवादीचे दुसरे आमदार रमेश कदम यांच्या भेटीला फार कोणी गेले नाही. आपण भाजपला मतदान केल्याचा दावा कदम यांनी केला.

किती मते फुटली ?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही मतदानाचा हक्क बजावला. काँग्रेस, राष्ट्रवादी व अन्य विरोधकांची मते फुटल्याचा दावा भाजपच्या गोटातून करण्यात येत होता. ‘विक्रमी मतांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद हे विजयी होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मतदान करून बाहेर पडताना काँग्रेसचे नितेश राणे यांनी, मधुर भांडारकर यांची पत्रकार परिषद उधळवून लावणे ही काँग्रेसची संस्कृती आहे का, असा सवाल केल्याने त्यांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त करण्यात येत होता. राणे समर्थकांची मते कोणाला मिळाली याची चर्चा मग सुरू झाली. क्षितिज ठाकूर हे अमेरिकेत असल्याने मतदानासाठी आले नाहीत, असे त्यांचे वडील आणि बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले.

First Published on July 18, 2017 4:58 am

Web Title: presidential election 2017 chhagan bhujbal ncp