राष्ट्रपतीपदाची निवडणूक पुढील महिन्यात होणार असून, उमेदवाराच्या नावाला समर्थन मिळवण्यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न सुरु असतानाच, मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे मन वळवणे भाजपसाठी कठिण जाणार आहे, असे दिसते. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी काँग्रेससह विरोधी पक्ष आणि भाजपसह एनडीएतील घटक पक्षांमध्ये जोरबैठका सुरू असतानाच शिवसेनेने ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ एम. एस. स्वामीनाथन यांचे नाव राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी पुढे केले आहे. एनडीएने राष्ट्रपतीपदासाठी स्वामीनाथन यांच्या नावाची घोषणा करावी, असे शिवसेनेने म्हटले आहे.

शिवसेनेने राष्ट्रपतीपदासाठी सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव पुढे केले होते. त्यानंतर भागवत यांनी आपण राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले होते. पण शिवसेनेने पुन्हा त्यांचेच नाव पुढे केले होते. हिंदू राष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भागवत यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरावे, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक पदाधिकारी भाजप शासित राज्यांमध्ये राज्यपाल आहेत. मग भागवत यांनी राष्ट्रपती व्हायला काय हरकत आहे, असे ते म्हणाले होते. त्यावर पुन्हा आपण राष्ट्रपतीपदासाठी इच्छुक नसल्याचे भागवत यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे आता शिवसेनेने स्वामिनाथन यांचे नाव पुढे केले आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार म्हणून सरसंघचालक मोहन भागवत यांना आपली पहिली पसंती आहे. पण त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करायचे नसेल तर एनडीएने प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार घोषित करावे, अशी आमची मागणी असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले. दरम्यान, भाजप अध्यक्ष अमित शहा मुंबई दौऱ्यावर असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीत शिवसेनेच्या या प्रस्तावावर ते काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.