विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १८ दिवस उलटून गेल्यानंतरही अद्याप कोणताही पक्ष सत्ता स्थापन करण्यास असमर्थ ठरल्याने अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. राज्यावर ओढवलेल्या या स्थितीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजे महाराष्ट्राचा घोर अपमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे यांनी राज्यातील या स्थितीबाबत भाष्य करणारे ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये ते म्हणतात, राष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजे या नतद्रष्टांनी महाराष्ट्राच्या मतदारांचा केलेला घोर अपमान आहे.

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच सुटू न शकल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यपालांनी जो प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठवला होता त्या प्रस्तावावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सही केली आहे. आज सकाळपासूनच आजच राष्ट्रपती लागू होईल अशी चर्चा सुरु होती. यासंदर्भातली शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली होती. भाजपाने सत्ता स्थापनेसाठी असमर्थता दाखवल्यानंतर शिवसेनेला संधी देण्यात आली. मात्र शिवसेना दावा सिद्ध करु शकली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला त्यानंतर चोवीस तासांची मुदत देण्यात आली मात्र त्याच्या आतच राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. राष्ट्रपती राजवटीच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे.

याआधी आज दिवसभर अनेक घडामोडी घडल्या. उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोघेही संपर्कात होते. तसंच काँग्रेसचे नेतेही दिल्लीहून शरद पवार यांच्या भेटीसाठी आले आहेत. अशा सगळ्या घडामोडी घडत असताना दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कॅबिनेटची बैठकही झाली. या बैठकीत महाराष्ट्रातल्या सत्ता पेचावर चर्चा झाली आणि त्यानंतर अवघ्या दोन तासांत राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या प्रस्तावावर राष्ट्रपतींकडून सही करण्यात आली.