श्रीमंत बाजीराव पेशवे, त्यांची पहिली पत्नी काशीबाई आणि दुसरी पत्नी मस्तानी यांची कथा सांगणाऱ्या संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटात बाजीरावांचे आणि पर्यायाने इतिहासाचे चुकीच्या पद्धतीने चित्रण केले असल्याची सडकून टीका होत असताना आता या वादाच्या निमित्ताने खुद्द पेशव्यांचे आणि मस्तानीचे वंशज एकत्र आले आहेत. गेली अनेक वर्षे पेशवे आणि मस्तानी यांचे वंशज एकमेकांच्या संपर्कात आहेत, त्यांचे एकमेकांकडे येणे-जाणे आहे. या वादाच्या निमित्ताने त्यांच्या पिढय़ांचे एकत्रित असणे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
ऐतिहासिक नात्याने जोडली गेलेली ही दोन घराणी वर्तमानकाळात ‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादाच्या निमित्ताने मुंबईत पहिल्यांदाच एका पत्रकार परिषदेत जाहीरपणे एकत्र आली. यानिमित्ताने या दोन घराण्यांमधील सध्याचे पिढीचे धागेदोरेही पहिल्यांदाच उलगडले.
‘‘मस्तानीचे वंशज मोठय़ा प्रमाणावर आहेत. त्यांच्यापैकी बरेच जण इंदोरमध्ये स्थायिक आहेत. पुण्यात उमर अली बहाद्दर म्हणून त्यांचे वंशज होते. सध्या सर्वसामान्यांप्रमाणे नोकरी-व्यवसाय करणारी ही मंडळी आहेत,’’ असे इतिहास संशोधक मंदार लवाटे यांनी सांगितले. शनिवारवाडय़ासमोर बाजीरावांच्या पुतळ्यांचे अनावरण झाले तेव्हाही हे सगळे जण तिथे एकत्र आले होते. इंदूरमध्ये बाजीरावांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम केले जातात. त्यांच्याचबरोबर पेशव्यांच्या सरसेनापती उमाबाईसाहेब खांडेराव दाभाडे यांचे वंशज तळेगावचे सरदार सत्यशीलराजे दाभाडे, पेशव्यांचे सरदार पिलाजीराव जाधव यांच्या सूनबाई अशी सरदार घराणीही एकत्र जोडलेली आहेत. ही मंडळी या चित्रपटाबद्दल नाखूश असून त्याविरुद्ध एकत्र आले आहेत. आपल्या घराण्याच्या इतिहासाबद्दल त्यांच्या आजच्या पिढीमध्ये अभिमान आहे. आपला इतिहास अभ्यासून पाहण्याची उत्सुकता आहे हे महत्त्वाचे वाटते, असे लवाटे यांनी सांगितले.
‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटाचे प्रोमोज, त्याची गाणी पाहिल्यानंतर या दोन्ही कुटुंबांमध्ये आपापसात चर्चा सुरू झाली होती. मस्तानीचे वंशज असलेले अवेस नवाब बहाद्दूर साब यांनी इंदूरमध्ये पत्रकार परिषद घेतलीच, शिवाय उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. या चित्रपटातून विपरीत इतिहास लोकांपर्यंत पोहोचू नये, यासाठी चित्रपट प्रथम आम्हाला दाखवला जावा, अशी मागणी उदयसिंह पेशवे यांच्याबरोबर इंदोरमध्ये वास्तव्यास असलेले बहाद्दूर साब यांनी एकत्रितरीत्या केली.

‘चित्रपट आम्हाला दाखवा’
या चित्रपटातून आणखी काही विपरीत इतिहास लोकांपर्यंत पोहोचू नये, यासाठी चित्रपट प्रथम आम्हाला दाखवला जावा, अशी मागणी उदयसिंह पेशवे यांच्याबरोबर मस्तानीचे इंदूरमध्ये वास्तव्यास असलेले वंशज अवेस नवाब बहाद्दूर साब यांनी एकत्रितरीत्या केली. कोणताही अभ्यास-संशोधन न करता, त्यांच्या वंशजांकडून माहितीची खातरजमा न करता हा चित्रपट बनवण्यात आला असल्याची टीका या सर्वानी केली आहे.
बाजीराव-मस्तानीच्या वंशजांनी मुंबईत एकत्रित पत्रकार परिषद घेतली.

Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
Raj Thackerey teaser
VIDEO : राज ठाकरे- अमित शाह यांच्या बैठकीत काय ठरलं? शिवतीर्थवरून मिळणार उत्तर, पाहा पाडवा मेळाव्याचा टीझर!
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?