राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता शिवसेना सरकारला पाठिंबा द्यावा म्हणून काँग्रेस आमदारांनी पक्षाच्या नेत्यांवर दबाव वाढविला आहे. जयपूरमध्ये असलेल्या आमदारांनी पक्षाच्या नेत्यांकडे शनिवारी ही आग्रही मागणी लावून धरली.

काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी व प्रियंका गांधी यांची विशेष सुरक्षा व्यवस्था मोदी सरकारने काढून घेतली. या मुद्दय़ावर जयपूर येथे असलेले काँग्रेस आमदार आक्रमक झाले. मोदी-शहा एवढे टोकाचे पाऊल उचलतात, मग आपणही भाजपला धडा शिकविला पाहिजे, असा काँग्रेस आमदारांचा पवित्रा होता. पक्षाचे सरचिटणीस वेणूगोपाळ, राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे आमदारांनी ही मागणी लावून धरली. सोनिया गांधी या शिवसेनेबरोबर हातमिळवणी करण्याकरिता तयार नसल्या तरी काँग्रेस आमदारांचा दबाव वाढला आहे. एसपीजी सुरक्षा व्यवस्था काढून घेतल्याने आमदारांना निमित्तच मिळाले.

राज्यातील परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलाविली आहे. यात पुढील सरकार स्थापन करण्याबाबत चर्चा होणार आहे.