सीएए, एनआरसी आणि एनपीआर विरोधात नागपाडय़ात गेले १३ दिवस सुरू असलेले आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. आंदोलन मागे घेण्याकरिता महिलांवरील राजकीय दबाव वाढत आहे. मात्र, एनआरसी आणि एनपीआर लागू न करण्याचे लेखी आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका आंदोलनकर्त्यां महिलांनी घेतली आहे.

हजारोच्या संख्येने स्थानिक महिला आंदोलनात उतरल्या असून गेल्या १३ दिवसांपासून त्यांनी नागपाडय़ातील मोरलँड रस्त्यावर ठिय्या दिला आहे. नोकरदार महिला, महाविद्यालयीन तरुणी, ज्येष्ठ नागरिक अशा विविध वयोगटातील महिलांचा यात समावेश आहे. आंदोलनाच्या ठिकाणी कडक सुरक्षाव्यवस्था तैनात आहे. गेले काही दिवस पोलीस आंदोलकांना हटविणार असल्याच्या अफवा पसरत असल्याने आंदोलनस्थळी मोठय़ा संख्येने महिला दाखल होत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नसीम सिद्दिकी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन महिलांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन केले. मात्र आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय येथून हटणार नाही, असा पवित्रा महिलांनी घेतला आहे. मात्र मुंबई बागेतील आंदोलन मागे घ्यावे यासाठी पोलिसांकडून त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. आंदोलकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा धाडल्या आहेत. तसेच शुक्रवारी काही कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची चौकशी करण्यात आली.