04 March 2021

News Flash

रेल्वेतील कोटय़ासाठी प्रवाशांची ‘वय चोरी’

मेल-एक्स्प्रेसमधील प्रवासात सवलतीसाठी ज्येष्ठ नागरिक असल्याची बतावणी

(संग्रहित छायाचित्र)

एक्स्प्रेस गाडय़ांमधून प्रवास करताना सवलत आणि कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी काही प्रवाशांनी वयाची चोरी केल्याची प्रकरणे उजेडात आली आहेत.

एक्स्प्रेस गाडय़ांमधून प्रवास करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक असल्याचे दाखवून तिकीट काढले जाते. मात्र प्रवासात या प्रवाशांचे ओळखपत्र तपासल्यानंतर ज्येष्ठ नागरिक नसल्याचे  उघडकीस आले आहे. ऑक्टोबर महिन्यात मध्य रेल्वेवर अशी १११ प्रकरणे उघडकीस आली असून एक लाखाहून अधिक दंडही वसूल केला आहे.

मेल-एक्स्प्रेसमधील प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना प्रवास सवलत मिळते. त्याचबरोबर त्यांचा कन्फर्म तिकिटासाठीही प्राधान्याने विचार तर केला जातोच. याशिवाय त्यांना लोअर बर्थही उपलब्ध केले जाते. ५८ आणि त्यापुढील वय असलेल्या महिला व ६० वर्षांपुढील पुरुष प्रवाशांना रेल्वे प्रवासात ५० टक्के सवलत मिळते. यासाठी ज्येष्ठ नागरिकांना सोबत ओळखपत्र बाळगावे लागते. तिकीट तपासनीस येताच हे ओळखपत्र दाखवणे गरजेचे असते. परंतु अशा सवलती व सुविधांसाठी प्रवाशांकडून वयाची चोरीच करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.

तिकीट काढताना ५८ किंवा ६० पेक्षा जास्त वय असल्याचे त्यावर दाखवले जाते. मात्र तिकीट तपासनीसांकडून अशा प्रवाशांकडे तिकीट व ओळखपत्र मागितल्यानंतर या दोन्हींवर वयात तफावत आढळली आहे. ओळखपत्रावर असलेली जन्मतारीख पाहता तिकिटावर नमूद केलेले महिलांचे वय ५८ पेक्षा आणि पुरुष प्रवाशांचे वय ६० पेक्षा कमी असल्याचे मध्य रेल्वेवर पकडण्यात आलेल्या प्रकरणांत निदर्शनास आले आहे. अशी १११ प्रकरणे उघडकीस आल्याची माहिती मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. एक्स्प्रेस गाडय़ांमधील अप्पर क्लास दिल्याने ते बदलण्यासाठी बतावणी केल्याची चार प्रकरणे उघडकीस आली असून यात ७ हजार ६९० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

आधार कार्डही बनावट : रेल्वे प्रवासात प्रवाशांकडे बनावट ओळखपत्रही आढळले आहे. अशी ४० बनावट ओळखपत्रे वेगवेगळ्या प्रकरणांत प्रवाशांकडून हस्तगत केली आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दुसऱ्याच्या तिकिटावर प्रवास : एक्स्प्रेस गाडय़ांच्या तिकिटांतही गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे. एका प्रवाशाने स्वत:च्या नावावर असलेल्या तिकिटावर दुसऱ्या प्रवाशाला प्रवास करण्याची मुभा दिल्याचीही प्रकरणे समोर आली आहेत. अशी २५९ प्रकरणे उघडकीस आली असून २ लाख १४ हजार ८१० रुपये दंड वसूल केला आहे. तर ई-तिकिटातही फेरफार केल्याची ७० प्रकरणे उघडकीस आणताना यात काही जणांना पकडण्यात आले आहे. यातूनही ५३ हजार ५४० रुपये दंड प्राप्त केल्याचे सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2019 1:50 am

Web Title: pretending to be senior citizens for travel in mail express abn 97
Next Stories
1 अलिबाग किनाऱ्यावर एकही बेकायदा बंगला नको!
2 राष्ट्रवादी सरकार स्थापण्याचा दावा करणार का ?
3 सत्तास्थापनेचा घोळ सुरूच!
Just Now!
X