संदीप आचार्य

भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, आगामी काही वर्षांत भारत ही मधुमेहाची जागतिक राजधानी बनेल असे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. मधुमेहाच्या रुग्णांची संख्या एकीकडे वाढत असताना गर्भवती महिलांमधील मधुमेहाचे वाढते प्रमाण हे जास्त चिंताजनक असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.

जगभरात दहा गर्भवती महिलांमागे एक महिला मधुमेहाची रुग्ण असते, तर भारतात हेच प्रमाण पाच महिलांमागे एका गर्भवती महिला मधुमेहाची रुग्ण इतके आहे. गंभीरबाब म्हणजे गेल्या काही वर्षांत हे प्रमाण वाढताना दिसत असल्याचे ‘इंटरनॅशनल डायबिटिक फेडरेशन’च्या दक्षिण आशिया विभागाचे नियोजित अध्यक्ष डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.

भारतात साडेनऊ कोटी लोकांना मधुमेहाचा विकार असल्याचा अंदाज आहे. २०३० मध्ये हे प्रमाण साडेदहा कोटी एवढे होईल, निरीक्षण असे जागतिक आरोग्य संघटनेचे नोंदवले आहे. त्याच वेळी गर्भारपणाच्या काळात महिलांमध्ये होणारा मधुमेह चिंताजनक असून बहुतेक प्रकरणात मधुमेहाचे निदानच केले जात नसल्यामुळे आई व होणाऱ्या बाळाच्या आरोग्यासाठी हे चिंताजनक असल्याचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले. ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ या संस्थेने ग्रामीण भागात काही ठिकाणी केलेल्या पाहणीत हे प्रमाण ६.७ टक्के तर काही ठिकाणी १३ टक्क्यांपर्यंत गेल्याचे आढळून आले आहे. भारतात जवळपास २० ते ३० वयोगटातील दोन कोटी २० लाख महिलांना मधुमेह असल्याचे दिसून आले आहे. ‘रिसर्च सोसायटी फॉर द स्टडी ऑफ डायबीटिस इन इंडिया’२०१८ च्या अंकातील एका शोधनिबंधात गर्भरपणाच्या काळात महिलांमधील शर्करेचे रक्तात मिसळण्याच्या प्रमाणात ११ टक्क्यांनी वाढ झाल्याचे नमूद केले आहे.

भारतात दहा टक्के नागरिक त्रस्त

भारतात जवळपास दहा टक्के नागरिकांना मधुमेह असून यात महिलांचे प्रमाण मोठे आहे. त्यातही गर्भवती महिलांमधील प्रमाण चिंताजनक असून हे प्रमाण २०१७ साली जवळपास २० टक्के होते. यात आता वाढ झाली आहे. यात ग्रामीण भागात गर्भारपणाच्या काळात मधुमेहाच्या चाचणीबाबत असलेली उदासीनता हे प्रमुख कारण असल्याचे डॉ. जोशी यांचे म्हणणे आहे.

अशी काळजी घ्या..

*  गर्भारपणाच्या काळात मधुमेहाची नियमित चाचणी करणे गरजेचे आहे.

*  दोन खाण्यामधील अंतर व सावकाश खाणे महत्त्वाचे आहे.

*  दोन दोन तासांनी थोडे थोडे खाल्ल्यास मधुमेहाचा त्रास टाळता येऊ शकतो.

तज्ज्ञांचा सल्ला

अनेकदा गर्भारपणाच्या पहिल्या काही आठवडय़ात मधुमेहाची चाचणी केल्यास मधुमेह आढळून येत नाही तथापि २० आठवडय़ानंतर मधुमेह असल्याचे दिसून येते. यासाठी नियमित चाचणीबरोबरच खाण्यापिण्याची योग्य प्रकारे काळजी घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.