जगभर थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने शनिवारी आणखी एक प्रतिबंधात्मक पाऊल उचलले. महापालिका, नगरपालिका आणि पंचायत क्षेत्रातील सर्व शासकीय आणि खासगी शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवण्या, प्रशिक्षण केंद्रे आणि मॉल्स ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाने जारी केले. दरम्यान, राज्यातील करोनाबाधितांची संख्या ३१वर पोहोचली आहे.

शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात येणार असली तरी दहावी-बारावीच्या परीक्षा तसेच महाविद्यालयीन परीक्षा वेळापत्रकानुसारच होतील, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, बुलढाण्यात शनिवारी एका ७१ वर्षीय संशयित रुग्णाचा मृत्यू झाला. विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव अजोय मेहता तसेच आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास तसेच अन्य अधिकाऱ्यांच्या बैठकीत राज्यातील परिस्थितीचा आढाव घेण्यात आला. त्यानंतर शाळा, महाविद्यालये आणि प्रशिक्षण संस्था बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय कोणत्याही स्वरूपाच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी लागू करण्यात आली असून याबाबतच्या सूचनांची संबंधित यंत्रणांनी काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आरोग्य विभागाच्या आदेशात म्हटले आहे.

राज्यात शनिवारी १४ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आल्याने एकूण रुग्णसंख्या ३१ झाली आहे. नव्या नऊ रुग्णांपैकी चार जण दुबईहून आले होते. त्यातील दोघे यवतमाळ येथील असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर अहमदनगर आणि मुंबईत प्रत्येकी एक रुग्णालयात दाखल आहे. याशिवाय मुंबईत आणखी चार जण बाधित असून त्यातील दोघे दुबई येथून, तर अन्य दोघे अमेरिका आणि फ्रान्स येथून आले आहेत. चीन, इटली, इराण, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनीतून येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवसांसाठी विलगीकरण कक्षात ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने शनिवारी जारी केला.

मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर १४ मार्चपर्यंत १४९४ विमानांतून आलेल्या १,७३,२४७ प्रवाशांची तपासणी करण्यात आल्याचे आरोग्य विभागाने पत्रकात नमूद केले आहे. १८ जानेवारीपासून सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळलेल्या ६६३ जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यापैकी ५३८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोनाकरिता नकारात्मक आले आहेत. ३१ जणांची करोना चाचणी सकारात्मक आली आहे. राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले असून यासाठी ५०२ खाटा उपलब्ध केल्या आहेत, असेही आरोग्य विभागाने आदेशात म्हटले आहे.

आदेशभंग केल्यास कठोर कारवाई

सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारने शाळा-महाविद्यालये, चित्रपटगृह, नाटय़गृहे, तरणतलाव बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. तरीही चित्रपटगृह सुरू ठेवण्यात येत असल्याचे आढळले असून सरकारी आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, क्रीडा कार्यक्रम आणि सभा-संमेलनांना परवानगी देऊ नये. तसेच आधी दिलेली परवानगी रद्द करण्याचा आदेश प्रशासनाला देण्यात आला आहे. त्यात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

बुलढाण्यात संशयिताचा मृत्यू

सौदी अरेबियातून आलेल्या एका ७१ वर्षीय व्यक्तीचा बुलढाण्यात शनिवारी दुपारी मृत्यू झाला. त्याला करोनाचा संसर्ग असल्याचा संशय आहे. या व्यक्तीला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. सरकारी रुग्णालयाचे प्रमुख प्रेमचंद पंडित यांनी पीटीआयला सांगितले की, या व्यक्तीला काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

* बुलढाण्यात ७१ वर्षीय संशयित रुग्णाचा मृत्यू

* राज्यात नऊ नव्या रुग्णांची नोंद

* पुण्यातील १० रुग्णांची प्रकृती स्थिर

* पिंपरी-चिंचवडमध्ये ५ नवे रुग्ण

* यवतमाळमध्ये दोघांना बाधा

* नागपुरात नवा रुग्ण आढळला

* मुंबईत आणखी एकाला विषाणूसंसर्ग

* नाशिकमध्ये दोन संशयित रुग्ण

* मास्क, सॅनिटायझरच्या काळाबाजाराविरुद्ध धडक मोहीम

* समाजमाध्यमे जबाबदारीने वापरण्याचे पोलिसांचे आवाहन

* धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना परवानगी नाही

* चित्रपटगृहे, नाटय़गृहे, व्यायामशाळा बंद राहणार

करोना ‘अधिसूचित आपत्ती’

नवी दिल्ली : राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) देण्यासाठी केंद्र सरकारने शनिवारी करोना विषाणूला ‘अधिसूचित आपत्ती’ जाहीर केले. करोना विषाणूने देशात आतापर्यंत दोन बळी घेतले आहेत. पहिला बळी कर्नाटकात कलबुर्गी येथे, तर दुसरा दिल्लीत गेला होता. दिल्लीत शुक्रवारी मृत्यू झालेल्या महिलेवर राम मनोहर लोहिया रुग्णालयाचे अधिकारी आणि एमसीडीच्या देखरेखीखाली शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. उत्तर प्रदेशात सात जणांची चाचणी सकारात्मक आली असून राजस्थान व दिल्लीत प्रत्येकी एकाला उपचारानंतर घरी सोडण्यात आले.

दहावी-बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार

इयत्ता दहावी आणि बारावी तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा मात्र वेळापत्रकानुसारच होतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षाही नियोजित वेळेतच होईल, असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले. परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये काही लक्षणे आढळल्यास अशा विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे परीक्षेला बसविले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.