उत्तर प्रदेशातील हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी निघालेल्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवून धक्काबुक्की केली तसेच त्यांना अटक करण्यात आली, ही युपी सरकारची दडपशाही आहे, अशा शब्दांत महसूल मंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपावर टीका केली आहे.

उत्तर प्रदेश सरकारच्या दडपशाही विरोधात थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले. यावेळी उत्तर प्रदेशातील भाजपा सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी थोरात म्हणाले, “उत्तर प्रदेशात कायद्याचे नाही तर जंगलराज आहे हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. उत्तर प्रदेशात महिला व मुलींच्या अब्रूचे लचके तोडले जात आहेत. हाथरस येथील अमानवीय घटनेतील आरोपींनी पाठीशी घालण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेश सरकार करत आहे, त्यामुळेच राहुल गांधी गांधी आणि प्रियंका गांधी यांना हाथरस येथे जाऊ दिले जात नाही.”

“काँग्रेस पक्ष पीडित कुटुंबियांच्या तसेच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत खंबीरपणे उभा आहे. भाजपा सरकारच्या दडपशाहीला आम्ही भीक घालत नाही. पीडित कुटुंबियाला न्याय मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष सरकार विरोधात संघर्ष करत राहील,” असेही यावेळी महसूलमंत्री थोरात म्हणाले.