मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या ‘बेस्ट’ उपक्रमाने पुढच्या तीन वर्षांसाठी वीजदराचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे दिला असून २०१३-१४ या चालू आर्थिक वर्षांसाठी त्यात घरगुती ग्राहकांसाठी नऊ ते १४ टक्क्यांची दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.

मुंबई शहरात ‘बेस्ट’तर्फे वीजपुरवठा केला जातो. ‘बेस्ट’चे सुमारे दहा लाख वीजग्राहक आहेत. राज्य वीज नियामक आयोगाच्या बहुवार्षिक वीजदर रचनेच्या पद्धतीनुसार ‘बेस्ट’ने हा २०१३-१४ ते २०१५-१६ या तीन वर्षांसाठी वीजदरवाढीचा प्रस्ताव दाखल केला आहे. त्यात यावर्षी वीजदराबरोबरच दर महिन्याला आकारण्यात येणाऱ्या स्थिर आकारातही वाढ सुचवण्यात आली आहे. ती २५ ते ५० टक्के इतकी आहे.

या वर्षांसाठी दरमहा १०० युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या घरगुती ग्राहकांना १४ टक्के वीजदरवाढ सुचवण्यात आली आहे. तर १०० ते ३०० युनिटपर्यंत वीजवापर असलेले आणि ५०० युनिटपर्यंतच्या ग्राहकांसाठी १३ टक्क्यांची वीजदरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. ५०० युनिटपेक्षा अधिक वीजवापरणाऱ्या ग्राहकांसाठी ९ टक्क्यांची वीजदरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. परिवहन विभागाच्या तोटय़ाच्या वसुलीसाठी वीजग्राहकांवर आकारण्यात येणाऱ्या शुल्कात कसलीही वाढ मागण्यात आलेली नाही.

पुढच्या वर्षी २०१४-१५ मध्ये शंभर युनिटर्पयच्या ग्राहकांसाठी १० टक्के, ३०० युनिटपर्यंतच्या ग्राहकांसाठी १० टक्के, ३०० ते ५०० युनिट वीजवापर असलेल्या ग्राहकांसाठी तीन टक्के तर ५०० युनिटपेक्षा अधिक वीजवापर असलेल्या ग्राहकांसाठी पाच टक्के दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. २०१५-१६ साठी ५०० युनिटपर्यंतच्या सर्व ग्राहकांना दहा टक्के वीजदरवाढ तर ५०० युनिटपेक्षा जास्त वीजवापर असलेल्या ग्राहकांसाठी पाच टक्के दरवाढ सुचवण्यात आली आहे.

 

वाढ कशी आणि कुठे?

* स्थिर आकार- २५ ते ५० टक्के

* १०० युनिटपर्यंत वापर असेल तर १४ टक्के

* १०० ते ५०० युनिटपर्यंत वापर असेल तर १३ टक्के ५०० च्यापुढे ९ टक्के