किलोमागे १० रुपयांची वाढ; आणखी दरवाढीची भीती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 मुंबई, ठाणे, नाशिक : सप्टेंबर महिन्यात पावसाने ओढ घेतल्याने कांद्याच्या उत्पादनाला फटका बसला असून आवक घटल्यामुळे कांद्याचे भाव ६ ते १० रुपयांनी वाढले आहेत. दसऱ्यापर्यंत ते आणखी वर जाण्याची चिन्हे आहेत.

मुंबई, ठाणे आणि उपनगरांतील बाजारपेठांमध्ये किरकोळ बाजारपेठांमध्येही कांद्याच्या दराने ३० रुपयांवर उसळी घेतली आहे. वाशीच्या घाऊक बाजारात गेल्या आठवडय़ात किरकोळ विक्रेत्यांना १० किलो कांदा १३० रुपये ते १५० रुपये दराने उपलब्ध होत होता. मात्र आजघडीला २२० ते २५० प्रति दहा किलो दराने कांदा मिळू लागला आहे. काही दिवसांत कांद्याचा दर ६० ते ७० रुपयांपर्यंत जाईल, असा अंदाज गिरगाव येथील कांदा विक्रेते विलास राजपुरे यांनी व्यक्त केला.

भायखळा मंडईमध्ये दररोज कांद्याच्या ३५० ते ४०० गाडय़ांची आवक होत होती. मात्र सोमवारी कांद्याची आवक घटली असून सोमवारी साधारण ५० ते ६० गाडय़ा कमी आल्या. त्यामुळे कांद्याचा पुरवठा कमी झाला आहे. भायखळा मंडईतील घाऊक बाजारात पूर्वी साधारण १० ते १२ रुपये प्रतिकिलो दराने कांदा विकला जात होता. सोमवारी त्याचा दर प्रतिकिलो १५ ते २० रुपये झाला, अशी माहिती भायखळा भाजी मार्केटचे अध्यक्ष किरण झोडगे यांनी दिली.   नवी मुंबईतील बाजार समितीमध्ये १२० ते १३० गाडय़ांची नोंद होत होती. मात्र, आता केवळ ९० ते ९५ गाडय़ांची नोंद होत आहे. असे असले तरी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक स्थिर असून कांद्याचे दर १० ते १२ रुपये इतके आहेत. कांदा-बटाटा आडत व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत रामाणे यांच्याशी संपर्क साधला असता, तुटवडय़ामुळे दसऱ्यानंतर कांद्याच्या दरात कमालीची वाढ होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.

हंगामात काही अपवाद वगळता हजार रुपयांच्या खालीच रेंगाळलेल्या उन्हाळ कांद्याने सोमवारी प्रति क्विंटल सरासरी १८५१ रुपयांपर्यंत उसळी घेत सर्वाधिक भावाची नोंद केली. लासलगाव बाजार समितीत शुक्रवारच्या तुलनेत भाव ६५० रुपयांनी उंचावले. या दिवशी ११ हजार ५६८ क्विंटलची आवक झाली. त्यास किमान ७०० ते कमाल २१२१ रुपयांपर्यंत दर मिळाला. नवीन कांदा ऑक्टोबरच्या प्रारंभापासून बाजारात येतो. त्याच्या उत्पादनात घट होणार असल्याचे पडसाद बाजारात उमटले आहे.

कारण काय ?

* या वर्षी पाऊसमान कमी राहिल्याने त्याचे आगमन लांबले असून उत्पादनात आणखी घट होणार आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटकातील कांदा संपुष्टात आला आहे.

* या सर्वाची परिणती कांदा दर उंचावण्यात झाली. नाफेडचे माजी उपाध्यक्ष चांगदेवराव होळकर यांनी दुष्काळामुळे खरीप कांद्याच्या उत्पादनात निम्म्याने घटल्याचा अंदाज व्यक्त केला.

* या स्थितीत डिसेंबरमध्ये कांदा आयात करण्याची वेळ येऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नाफेडकडे उतारा

महानगरांमध्ये भाव गगनाला भिडल्यास दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने नाफेडमार्फत घाऊक बाजारातून कांदा खरेदी करून चाळीत साठविलेला आहे. नाफेडकडे सद्य:स्थितीत १० हजार मेट्रिक टन कांदा आहे. वाढते भाव लक्षात घेऊन सरकारच्या सूचनेनुसार त्या कांद्याचे नियोजन केले जाणार असल्याचे नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी सांगितले.

समीकरण एकसमान

बाजाराची संपूर्ण भिस्त महाराष्ट्रात साठविलेल्या उन्हाळ कांद्यावर आहे. नवीन कांदा मुबलक स्वरूपात आल्यास भावात चढ-उतार होऊ शकते. पाच ते सहा महिने साठविलेल्या उन्हाळ कांद्याचे आयुर्मान संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. साठवणुकीत वजन घटते, माल खराब होतो. चाळीत बऱ्यापैकी कांदा शिल्लक आहे. दर उंचावत असले तरी वजनातील घट, खराब माल यामुळे समीकरण एकसारखे होते, असे शेतकरी सांगतात.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Price of onions increases by rs 10 per kg
First published on: 16-10-2018 at 02:47 IST