डाळ-तांदळापाठोपाठ भाज्याही महागल्या  भेंडी ६० रु. किलो, कोबीही पन्नाशीकडे

दसरा-दिवाळीपासून स्वयंपाकघरापर्यंत पोहोचलेले महागाईचे शुक्लकाष्ठ अजूनही सामान्यांची पाठ सोडायला तयार नाही. दिवाळसणाच्या तोंडावर महागलेली तूरडाळ किलोमागे पावणेदोनशेच्या आसपास रेंगाळत असतानाच तांदूळही महाग झाला आहे. हे कमी म्हणून की काय टोमॅटोनेही अलीकडेच भाव खायला सुरुवात केली आहे. त्यात आता भाज्यांची भर पडली आहे. एरव्ही कोणाच्या खिजगणतीतही नसलेल्या भेंडीने किलोमागे ५० ते ६० रुपयांचा दर गाठला असून मेथी, पालक, कोबी, मटार यांच्या दरांनीही महागाईचा महत्तम सामाईक विभाजक (मसावि) वाढवण्यास हातभार लावायला सुरुवात केली आहे. घाऊक बाजारात फ्लॉवर, मटार, गाजर या भाज्यांचा निर्माण झालेला तुटवडा टोमॅटो व भेंडीच्या दरवाढीला कारणीभूत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
कमी पावसामुळे देशातील शेतीउत्पादनाचे गणित यावर्षी काहीसे कोलमडल्याचे चित्र आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्य़ातून संपूर्ण देशाला पुरवठा होणाऱ्या कांद्याने तीन महिन्यांपूर्वी ८० रुपयांचा भाव धारण केला होता. कांद्याच्या साठेबाजीविरोधात केंद्राने वेळीच पावले उचलल्याने ही दरवाढ आटोक्यात आली. मात्र, तरीही कांद्याने झटका दिलाच होता. त्यामुळे गृहिणींचे पाकगृहाचे अर्थनियोजन फिसकटले होते. त्यातच तूरडाळीने दिवाळसणाच्या तोंडावरच दोनशेचा पल्ला गाठल्याने सामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले. उडीद डाळीनेही याच दरम्यान महागाईचे टोक गाठले. आता महागाईची ही लागण भाज्यांपर्यंत पोहोचली आहे. घाऊक बाजारात ३२ ते ३६ रुपये प्रतिकिलो दराने विकला जाणारा टोमॅटो किरकोळ बाजारात चक्क ६० ते ६२ रुपयांनी विकला जात आहे. भेंडीने तर किरकोळ बाजारात किलोमागे पन्नाशीच्या पलीकडे मजल मारली आहे. फ्लॉवर, कोबी, गाजर, मटार यासारख्या बाजारातील हक्काच्या भाज्या कमी झाल्याने ही दरवाढ झाली असल्याचे भाजीविक्रेत्यांचे म्हणणे आहे. येत्या आठवडय़ात गुजरातहून फ्लॉवर, राजस्थानातून गाजर व कर्नाटकातील मटार बाजारात दाखल झाल्यानंतर भाज्यांचे दर कमी होतील, असा विश्वास व्याापऱ्यांनी व्यक्त केला आहे.
प. महाराष्ट्र, विदर्भातही
तीच स्थिती
दिवाळीतील सुटय़ा लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी गेल्या आठवडय़ात पुण्यातील घाऊक बाजारात माल आणला नाही. त्यामुळे भाज्यांच्या दरात गेल्याच आठवडय़ातील तेजी कायम राहिली आहे. कांदा, बटाटा, लसूण आणि टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली असून या भाज्यांची आवक कमी होत असल्यामुळे त्यांचे दर वाढत आहेत. किरकोळ बाजारात टोमॅटो आणि कांद्याची विक्री ४० ते ६० रुपये किलो या दराने सुरू आहे. नागपूरसह विदर्भातही भाज्यांचे दर कडाडलेले आहेत. विदर्भात थंडीच्या मोसमात भाज्यांचे दर कमी असतात. मात्र, यंदा दर वाढलेले असल्याचे स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले. भाज्यांची ही दरवाढ कृत्रिम असण्याची शक्यता असल्याचे सांगत येत्या काही दिवसांत दर कमी होतील, असा आशावादही स्थानिक व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

डाळींचे दर लगेच कमी होण्याची शक्यता धूसर
डाळींच्या दराबाबत दिवाळीत अनेक घोषणा झाल्या. मात्र बाजारात डाळींचे दर कमी झालेले नाहीत. जप्त केलेली डाळ १०० रुपये प्रतिकिलो या दराने विकली जात असली, तरी खुल्या बाजारात मात्र डाळींचे दर जसे होते तसेच आहेत. लातूर, बार्शी, बीड वगैरे बाजारांमध्ये गावरान तूरडाळ जागेवरच १६० ते १८० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. डाळींचा हा शेवटचा हंगाम असून डाळ संपत आल्यामुळे डाळींचे दर कमी होण्याची चिन्हे नाहीत. डिसेंबरमध्ये डाळींचा नवा हंगाम सुरू होईल.

किरकोळ बाजारातील भाज्यांचे दर (रुपये/किलो)

टोमॅटो ६० ते ६५
मटार ७० ते ८०
शिमला मिरची ५०
फ्लॉवर ६० ते ८०
कार्ले ६०
ढोबळी मिरची ६० ते ८०
पालक, मेथी २० रुपये जुडी
चवळीच्या शेंगा ४०
तुरीच्या शेंगा ५०
लसूण १६०