पालकांची प्राथमिक शिक्षण परिषदेकडे तक्रार

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासाकरिता शालेय शिक्षण विभागाच्या वतीने वर्षभर तीन टप्प्यात घेतल्या जाणाऱ्या चाचणी परीक्षांच्या आयोजनातील ढिसाळपणा आणि गैरप्रकार सातत्याने समोर येत असतानाच मुंबईच्या मालाडमधील एका शाळेतील पालकानेच या परीक्षेदरम्यान झालेल्या गैरप्रकाराविरोधात आवाज उठवत शाळेविरोधात मुंबईच्या शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार दाखल केली आहे. शाळेत चाचणी परीक्षेदरम्यान शिक्षकच मुलांना प्रश्नांची उत्तरे लिहून घेण्यास सांगत असल्याची या पालकांची तक्रार आहे. पालकांनी या गैरप्रकाराबाबत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडेही याची लेखी तक्रार केली आहे. या चाचणी परीक्षांमधील गैरप्रकारांची प्रसारमाध्यमांमधून आतापर्यंत बरीच वाच्यता झाली आहे. मात्र एका पालकानेच पुढाकार घेऊन तक्रार करण्याची ही पहिलीच वेळ असावी.

भाषा आणि गणित या विषयांकरिता होणाऱ्या या चाचणी परीक्षा सांगली वगळता राज्यभरात सर्वत्र ६ आणि ७ एप्रिलला घेण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने वेळापत्रक शाळांना ठरवून दिले होते. मात्र, मालाड पश्चिम येथील अ‍ॅस्पी नूतन इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये या परीक्षा ६ आणि ७ ऐवजी एक दिवस आधीच म्हणजे ५ आणि ६ एप्रिलला घेण्यात आल्या. दोन्ही दिवशी शाळेची नियमित वार्षिक परीक्षा झाली. त्या काळात विद्यार्थ्यांची बैठकव्यवस्था बदलण्यात आली होती.

परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गात पाठवून संकलित मूल्यमापन-२ च्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. त्यानंतर शिक्षिकेने सांगितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सांगण्यात आले, अशी तक्रार वैशाली दोशी या पालकाने शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांच्या कार्यालयाकडे पत्र लिहून केली आहे. या बाबत विचारले असता चव्हाण यांनी अजून तरी आपल्याला ही तक्रार आली नसल्याचे सांगितले. ‘हा प्रकार गंभीर आहे. मात्र शाळा खासगी असल्याने या तक्रारीला अनुसरून शाळेने चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी, याबाबत शाळेच्या व्यवस्थापनाला कळविले जाईल,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. या संबंधी मुख्याध्यापिका नूझहट खान यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याकरिता शाळेच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.