राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शाळांमध्ये १३ डिसेंबर २०१३ नंतर नियुक्त झालेले प्राथमिक शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण झाले आहेत का? हे तपासण्यात येणार आहे. जर हे शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसतील तर त्यांची सेवा समाप्त करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. या संदर्भातील शासननिर्णय गुरुवारी जाहीर करण्यात आला आहे.

राज्यातील शाळांमध्ये शिक्षणांचा दर्जा वाढावा यासाठी प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्तीसाठी टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. केंद्र सरकारच्या बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने शिक्षक पदावर नियुक्तीसाठी पात्रता अणि सेवाशर्ती ठरविण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार राष्ट्रीय शिक्षक परिषद यांनी प्राथमिक शिक्षक (इयत्ता पहिली ते आठवी ) यांच्यासाठी किमान शैक्षणिक- व्यावसायिक अर्हता निश्चित केली आहे. शासनाच्या या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. यामुळे याची तपासणी करून ज्या शिक्षकांची नियुक्ती टीईटी उत्तीर्ण झाल्याशिवाय प्राथमिक शिक्षक सेवक पदावर करण्यात आली आहे अशा शिक्षकांची नोकरी धोक्यात येणार आहे. शासनाने १३ डिसेंबर २०१३ नंतर नियुक्त केलेल्या शिक्षकांची तपासणी करण्याचे ठरविले आहे.