कोकण पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांचा चिमटा

सावंतवाडी / रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी चक्रीवादळग्रस्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पडझडीची पाहणी केली आणि ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला भरघोस मदत केली आहे, ते संवेदनशील आहेत, महाराष्ट्रालाही मदत करतील’’, असे वक्तव्य केले. मी विरोधी पक्षनेत्यासारखा वैफल्यग्रस्त नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी मालवण चिवला बीचवरील नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी पंतप्रधान मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोले लगावले. केंद्र सरकारनेही अधिकाधिक मदत करावी म्हणून आम्ही विनंती करत आहोत. आम्हाला पंतप्रधानांकडून मोठ्या मदतीची अपेक्षा आहे. तसे आम्ही त्यांना कळवले आहे. पंतप्रधान संवेदनशील आहेत. ते गुजरातप्रमाणे महाराष्ट्रालाही नक्कीच मदत करतील, असा चिमटा काढतानाच, आम्हाला राजकारण करायचे नाही, विरोधी पक्षनेत्यांसारखा मी वैफल्यग्रस्त नाही, असा टोला त्यांनी लगावला.

विरोधकांनी आमची काळजी करू नये. कोकणाचे आणि माझे नाते घट्ट आहे. कुणी कितीही प्रयत्न केले तरी या नात्यात बाधा येणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दोन दिवसांत साह्य!

किनारपट्टीवरील गावांमध्ये मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. बागायतदार, मच्छिमारांचेही नुकसान झाले आहे. प्रत्येकाला मदत दिली जाईल. कुणालाही नाराज करणार नाही. येत्या दोन दिवसांत अहवाल येईल. त्यावर त्वरित निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. नैसर्गिक आपत्तीत नुकसान होते त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना करणे गराजेचे आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

कोकणी माणसाला पुन्हा उभे करू…

माझा ‘पॅकेज’वर विश्वास नाही, मात्र योग्य प्रकारे मदत देऊन कोकणी माणसाला पुन्हा उभे करू, अशी हमी मुख्यमंत्र्यांनी दिली. कोकण किनारपट्टीवर दरवर्षी वादळांमुळ मोठे नुकसान होते. त्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. किनारी भागात भूमिगत वीज वाहिन्या, पक्क्या घरांसह अन्य उपयोजना करण्यावर भर दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.