गेले दोन आठवडे दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आलेला मरिन ड्राइव्ह येथील प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर सोमवारपासून वाहतुकीसाठी खुला होत आहे.
पन्नास वर्ष जुन्या असलेल्या या उड्डाणपुलाची दुरुस्तीचे काम गेल्यावर्षी पावसाळ्यानंतर हाती घेण्याचे ठरले होते. मध्यरात्री पूल टप्प्याटप्प्याने बंद ठेवत पृष्ठभाग दुरुस्त करण्यात आला. मात्र दक्षिण मुंबईला जोडणारा महत्त्वाचा दुवा असल्याने वाहतूक पोलिसांकडून सांध्यांच्या दुरुस्तीसाठी पूल बंद ठेवण्याची परवानगी मिळत नव्हती. मे महिन्यात वाहनांची संख्या तुलनेने कमी असल्याने मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवडय़ात टप्प्याटप्प्याने पूल बंद ठेवून काम करण्यास परवानगी मिळाली. दुरुस्तीचे काम दोन दिवसांपूर्वीच पूर्ण झाले असले तरी सिमेंट काँक्रिट सुकण्यासाठी वेळ देण्यात आला. आता सोमवारपासून हा पूल पूर्णत खुला होईल, असे पूल विभागाचे मुख्य अभियंता एस. ओ. कोरी म्हणाले.