राज्य शिक्षण विभागातर्फे सध्या नव्या संचमान्येतेनुसार शिक्षक समायोजनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र ज्या शासन निर्णयानुसार ही संचमान्यता ठरविण्यात येत आहे. त्याध्येच त्रुटी असल्याने हे समायोजन योग्य ठरणार नाही, असा आरोप बुधवारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळातर्फे करण्यात आला. त्यामुळे या समायोजनेच्या प्रक्रियेवर बहिष्कार घालण्यात आल्याचे महामंडळातर्फे जाहीर करण्यात आला आहे. शिक्षकांच्या या बहिष्कारामुळे आता या प्रकरणाला नवे वळण लागण्याची शक्यता आहे.

ऑगस्ट २०१५च्या शासन निर्णयानुसार सध्या राज्यभरातील शिक्षकांची संचमान्यता ठरविण्याचे काम सुरू आहे. या सरकार निर्णयावरून सध्या बराच वाद सुरू आहे.  त्यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांसह शिक्षण विभागातील अनेकांना निवेदन देण्यात आले आहे. मात्र त्यानंतरही या त्रुटी दूर करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे जर या सरकार निर्णयानुसार समायोजना झाले तर माध्यमिक शाळांसमोर नव्या अडचणी निर्माण होतील, त्यामुळे  हा बहिष्कार घालण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळातर्फे हा बहिष्कार घालण्यात आल्याची माहिती प्रवक्ते प्रशांत रेडीज यांनी दिली.

तर या बहिष्कार आंदोलनामध्ये सर्व संस्था, शाळा व मुख्याध्यापक यांनी सहभाग घेऊन महामंडळाचे पुढील आदेश येईपर्यंत समायोजन प्रक्रियेवरील बहिष्कार कायम ठेवण्याचे आवाहन यानिमित्ताने केली आहे.