टाळेबंदीत झालेले कर्ज फेडण्यासाठी मुंबईतील एका तरुणाने बनावट नोटा छपाई सुरू केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या मोहम्मद फकीयान अय्युब खान (३५) याच्याकडून चार लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. संकेतस्थळांवर नोटा छपाईच्या चित्रफिती पाहून तरुणाने घरात बनावट नोटा छापल्याचे समजते.

माहूल परिसरातील एमएमआरडीएच्या वसाहतीत बनावट नोटा वटविण्याकरिता येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ४ला खबऱ्यांकडून मिळाली होती. त्यानुसार कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्या पथकाने सापळा रचला. खान नोटा वटविण्यासाठी माहूल परिसरात येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या वेळी पोलिसांना त्याच्याजवळ ५५ हजार ४५० रुपये मूल्य असलेल्या ६५७ बनावट नोटा सापडल्या. अधिक चौकशी केल्यावर चेंबूर येथील भाडय़ाच्या खोलीत नोटा छापत असल्याची माहिती खान याने पोलिसांना दिली. त्याने सांगितलेल्या घरातून पोलिसांनी तीन लाख ४३ हजार १०० रुपये मूल्याच्या ३०१५ बनावट नोटा जप्त केल्या. तसेच नोटा छपाईसाठी वापरलेले प्रिंटर, कागदांचे संच, शाई, लॅमिनेटर, हिरव्या रंगाचे पेपर रोल, पारदर्शक डिंक आदी साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले.

पालघर जिल्ह्य़ातील वाडा भागातून  २८ जानेवारीला बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त करून पोलिसांनी ३५ लाख रुपयांच्या नोटा जप्त केल्या होत्या.

यूटय़ूबचा आधार..

खान हा कापड व्यावसायिक होता. टाळेबंदीनंतर ग्राहकांचा पुरेसा प्रतिसाद नसल्याने व्यापाऱ्यांकडे खानचे पैसे थकले होते. त्यातून तो कर्जबाजारी झाला. कर्जाचा भार कमी करण्यासाठी त्याने नोटा छापण्याची शक्कल लढविली. यूटय़ूब आणि इंटरनेटवरील व्हिडीओ पाहून नोटा छापाईचे तंत्र तो शिकला. दोन हजार रुपयांच्या नोटा नागरिक तपासून घेत असल्यामुळे त्याने २००, १०० आणि ५० रुपयांच्या नोटा मोठय़ा प्रमाणात छापल्या, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, खानने याआधी किती बनावट नोटा वटविल्या याबाबत तपास सुरू आहे.