सायकलिंगसारख्या काहीशा पुरुषी क्षेत्रात एकांडी शिलेदारी करत प्रिसिलिया मदन या पनवेलच्या तरुणीने नुकतीच १९०० किलोमीटरची सायकल भटकंती पूर्ण केली आहे. पनवेल ते कन्याकुमारी ही १९ दिवसांची तिची सायकल भटकंती ११ जानेवारीला कन्याकुमारी येथे यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. आज प्रत्येक क्षेत्रात कामानिमित्ताने महिला जगाच्या कानाकोपऱ्यात भटकत असल्या तरी, सायकलवरून एकटय़ाने भटकणारी मुलगी हे भारतात तरी विरळाच म्हणावे असे हे उदाहरण असल्यामुळे सायकलिंग क्षेत्रात आज तिचे कौतुक होत आहे.
सायकलिंग हा खरे तर शारीरिक क्षमतेचा कस पाहणारा क्रीडाप्रकार! पण या भटकंतीत प्रिसिलियाच्या मानसिक शक्तीचादेखील चांगलाच कस लागला आहे. ‘तू हा प्रवास एकटीने का करतेस? तुझ्या आईवडिलांनी तुला जाऊ कसे दिले?’ संपूर्ण प्रवासात भेटणारा प्रत्येकजण तिला हेचप्रश्न सुरुवातीस विचारत असे. समाजावरील पुरुषप्रधानतेचा पगडा आणि महिला सुरक्षित नाही या खोलवर दडलेल्या मानसिकतेचेच प्रतीक असल्याचे तिने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
लोकांचा सुरुवातीचा हा दृष्टिकोन त्यांच्याशी बोलल्यानंतर बदलल्याचे ती नमूद करते. प्रिसिलिया सांगते की महाराष्ट्रातील सहा दिवसांच्या भटकंतीत ओळखीच्या लोकांकडे राहिल्यानंतर गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूतील तिचे सारे मुक्काम हे अनोळखी लोकांकडेच होते. यापैकी एकालाही ती कधीच भेटली नव्हती. आधीचा मुक्काम सोडताना पुढच्या मुक्कामाचा संपर्क मिळत असे आणि त्यातूनच तिचा हा प्रवास सुरू राहिला. केरळातील काही शाळा- महाविद्यालयांनी तिचे जोरदार स्वागत केले. हा अनुभव खूपच उत्साह देणारा होता असे ती सांगते.
संपूर्ण प्रवासात रस्त्यावरील वाहनांचा धोका सोडल्यास इतर कोठेही मला कधीच असुरक्षित वाटले नाही असे ती सांगते. केरळातील पय्यनूरला भाषेची अडचण आलीच, पण त्याचबरोबर गावाबाहेरील काहीसे आडवाटेवरचे घर परक्या माणसाबरोबर शोधताना उगाचच मनात अनेक शंकांचे मोहोळ जमा झाले. शक्यतो मुख्य रस्त्याने प्रवास करणारी प्रिसिलिया केरळातील पय्यनूर ते तेलेसरी या वाटेवर एकदा रस्तादेखील चुकली. मात्र त्या चाळीस-पन्नास किलोमीटरच्या प्रवासात तिला केरळच्या ग्रामीण जनजीवनाचा थेट अनुभव मिळाला. सायकलिंगचे बाळकडू तिला तिचे वडील धनजंय मदन या हाडाच्या सायकलपटूकडून मिळाले आहे. तर फ्रान्समधून भारतात सायकलिंगसाठी आलेल्या रुबिनाकडून तिला या एकांडय़ा भटकंतीची प्रेरणा मिळाली.